इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, विनोद तावडे आणि पीयूष गोयल यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
जाहीरनाम्यात भाजपने शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना आणि महिलांसाठी आर्थिक सहाय्याची हमी दिली आहे. भाजपचे हे संकल्पपत्र म्हणजे ‘विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र’ साकारण्याचा ‘रोड मॅप’ असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. २०१९ मध्ये दिलेल्या आश्वासनांप्रमाणेच या जाहीरनाम्यातील सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने त्यांच्या संकल्पपत्रात ‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये’ देण्याची घोषणा केली आहे. यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळण्यासह समाजात त्यांचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपने महिला सबलीकरणासाठी विशेष योजना राबविण्याचा संकल्प केला आहे.
शेतकऱ्यांसाठी हमीभावाने माल खरेदी करण्याची आणि भावांतर योजना राबवण्याची घोषणा भाजपने केली आहे. शेतमालाच्या दरात तफावत असल्यास शेतकऱ्यांना तफावत सरकारकडून भरून दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असून, आता १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक सुरक्षा वृद्धिंगत करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतो. महाराष्ट्रात २५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने आघाडी घेतल्यामुळे दहा लाख विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सौर ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करून राज्यातील वीज बिलांवर ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मेक इन महाराष्ट्र, फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे वचन भाजपने दिले आहे. विज्ञानात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी विशेष व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे.
………..