विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अमेरिकेने भारतासोबत कितीही मैत्री असल्याचे सांगितले तरीही त्यावर विश्वास ठेवू नये अशीच परिस्थिती आहे. राजकीय दृष्टीकोन असो वा व्यवसायिक, पण अमेरिकेला जगात कोणताच देश पुढे गेलेला आवडत नाही. भारताला तर ते मुख्य स्पर्धक मानतात. आता भारतीय बनावटीच्या लसीवरूनच अमेरिकेच्या मनातील ठसठस दिसू लागली आहे.
भारतात तयार झालेले कोवॅक्सिन प्रभावी नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेत कोवॅक्सिन घेतलेल्या लोकांना दुसऱ्यांदा लस घेण्यास सांगितले जात असल्याने ही भूमिका उघड झाली. अमेरिकेत भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि रशियाचे स्पुटनिक-व्ही लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्यांदा लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अर्थात हे ही तेवढेच खरे आहे की, अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने हे दोन्ही लस वापरण्याची परवानगी दिलेली नाही. अमेरिकेत मार्चपासून आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक महाविद्यलय आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण अनिवार्य करण्याची वारंवार घोषणा झाली आहे. त्यात आरोग्य संघटनेची परवानगी असलेली लसच घ्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
अमेरिकेतील शिक्षण सस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या भारतीय आणि रशियन विद्यार्थ्यांसाठी आता मोठे संकट निर्माण झाले आहे. भारतातील एका २५ वर्षीय तरुणीने कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. तिने भारतात लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र आता तिला कोलंबियात दाखल झाल्यावर दुसरी लस घ्यावी लागेल. इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांनीही हाच फतवा काढला आहे.
मंजुरीच्या प्रतिक्षेत
कोवॅक्सिनला आपात्कालीन परिस्थितीत वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. जुलै-सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची आशा आहे. याशिवाय ६० देशांच्या यादीतही कोवॅक्सिनचा समावेश होण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे भारत बायोटेकचे म्हणणे आहे. यात ब्राझील, अमेरिका, हंगेरीसारख्या देशांचा समावेश आहे.