वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळविल्यानंतर आनंद व्यक्त करणा-या पाकिस्तानला अमेरिकेने कठोर इशारा दिला आहे. पाकिस्तानचे तालिबानशी संबंध कसे असतील त्यावर अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध अवलंबून आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिकांना माघारी बोलावल्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वजनिक सभेत ब्लिंकन बोलत होते. पाकिस्तानची तालिबानसोबत असलेली मैत्री जगापासून लपून राहिलेली नाही. तालिबानचा समर्थक असल्याचे पाकिस्तानने वेळोवेळी दाखवून दिले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले, आगामी काही आठवड्यांमध्ये अफगाणिस्तानच्या भविष्याबाबत पाकिस्तान काय योगदान देणार आहे, हे पाहूनच पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबाबत अमेरिका विचार करणार आहे. तर अफगाणिस्तानात भारताच्या उपस्थितीचे ब्लिंकन यांनी कौतुक केले आहे. भारताच्या उपस्थितीमुळे अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या कारवायांवर परिणाम झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. ब्लिंकन सांगतात, अफगाणिस्तानात पाकिस्तानला होणारे अनेक फायदे अमेरिकेसाठी नुकसानदायक ठरणार आहेत. अफगाणिस्तानाच्या भविष्याबाबत पाकिस्तानचे दोन पाय दोन वेगळ्या नावेत आहेत. ते तालिबानला पाठिंबा देत असताना दहशतवादविरोधी लढ्यातही आमची मदत करत आहेत.
या चर्चेदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या अमेरिकेच्या खासदारांनी पाकिस्तानशी असलेल्या संबंधाबाबत अमेरिकेने पुनर्विचार करावा का, असा सवाल उपस्थित केला. त्यावर प्रशासनाकडून लवकरच विचार केला जाणार आहे. आगामी काळात आम्ही अनेक बाबींवर विचार करणार आहोत. गेल्या २० वर्षात पाकिस्तानने निभावलेल्या भूमिकेबाबत तसेच आगामी काळात आम्ही पाकिस्तानला कोणत्या भूमिकेत पाहू इच्छितो यावरही विचार केला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तान प्रकरणावरून संसद समितीसमोर सोमवारी सुनावणी झाली. अफगाणिस्तानातून सैनिकांना माघारी बोलावण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयाचाही त्यांनी जोरदार बचाव केला. अफगाणिस्तानच्या घटनाक्रमाबाबत अमेरिकेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात सुनावणी होणार आहे.