वॉशिंग्टन – कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेत मुलांना बाधा होण्याची शक्यता भारतात वर्तविली जात असताना अमेरिकेत ती खरी ठरताना दिसत आहे. तिथे लहान मुलांना कोरोनाची लागण होत असून सध्या अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये एकूण २३९६ संक्रमित मुले दाखल करण्यात आली आहेत. गेल्या एका आठवड्यादरम्यान २.५ लाखांहून अधिक लहान मुले बाधित आढळले आहेत. महामारी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत लहान मुले बाधित होण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
सध्या अमेरिकेत आढळणा-या कोरोनाच्या रुग्णांमध्ये २६ टक्के मुलेच आहेत. अमेरिकी अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर म्हणजेच चार आठवड्यांदरम्यान ७,५०,००० लहान मुले बाधित आढळले आहेत. हा आकडा खूपच भीतीदायक आहे. समाधानाची बाब म्हणजे लहान मुलांमधील मृत्यूदर खूपच कमी आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत ५२० मुलांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.
ऑगस्ट २०२० पासून ते आतापर्यंत रुग्णालयामध्ये दाखल होणा-या मुलांची संख्या ५५ हजारांच्या वर गेली आहे. सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या अमेरिकेच्या आरोग्य संस्थेनुसार, ६ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात प्रतिदिन ३६९ हून अधिक बाधित मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु शाळा उघडल्यामुळे मुलांना संसर्ग होत असल्याचे एकच कारण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशभरात डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहता संसर्ग होणार्या मुलांची संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्यांनी लस घेतली नाही, अशा लोकांनाच संसर्ग होत आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या इर्विंग मेडिकल सेंटरचे प्राध्यापक डॉ. एडिथ ब्राचो-सांचेज यांनी परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. शाळा सुरू ठेवण्यासाठी लहान मुलांना संसर्गापासून वाचविले पाहिजे, असे सीडीसीने म्हटले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४६.४ टक्के मुलांना आधी कोणताच आजार नव्हता. त्यामुळे आजारी मुलांपेक्षा आरोग्यदायी मुलांमध्ये कोरोनचा धोका कमी असतो हा भ्रम तुटला आहे.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित मुलांना मल्टि इंफ्लामेंटरी सिंड्रोम इन चिल्ड्रेन (मिस-सी) नावाचा आजार झाला आहे. सीडीसीच्या माहितीनुसार, ४४६१ मुले मिस-सीने बाधित झाले असून, त्यापैकी ४१ जणांचा मृत्यू झाला आहेत. या आजारामुळे शरीरातील विविध भाग जसे यकृत, मस्तिष्क आदी भागात सूज येते.अमेरिकेत १२ वर्षांहून अधिक वयाच्या मुलांना लस दिली जात आहे. १२ ते १५ वर्षांच्या २५ टक्के अमेरिकी मुलांना कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या वयातील ३३ टक्के मुलांना लशीचा एक डोस देण्यात आला आहे. १६ ते १७ वर्षांच्या ३७ टक्के मुलांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ४५ टक्के मुलांना एकच डोस देण्यात आला आहे.