वॉशिंग्टन – अमेरिकेत कोरोना महामारीचा कहर वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे गेल्या आठवड्यात अमेरिकेतील ४२ राज्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तर १४ राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनामुळे मृतांची संख्या वाढून ५० टक्के झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, २८ राज्यांमध्ये मृतांच्या संख्येत १० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. अलबामा हे सर्वात जास्त प्रभावित राज्यांपैकी एक आहे. अलबामामध्ये गुरुवारी ५० मृत्यू झाले आहेत. गेल्या दोन-तीन आठवड्यात येथे मृतांची संख्या दुहेरी आकड्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अलबामामध्ये ५,५७१ मुले बाधित झाले. मुले कोणाच्या संपर्कात आल्याने बाधित झाले हे अद्याप कळालेले नाही. राज्यात कोरोना संसर्गाचा दर २३ टक्के आहे. अमेरिकेत हा दर सर्वाधिक आहे.
मृतदेह ठेवण्यात जागा नाही
अलबामाचे आरोग्य अधिकारी डॉ. स्कॉट हॅरिस सांगतात, राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा दर सतत वाढत आहे. येथे मृतांचा आकडा इतका वाढला आहे, की मृतदेह ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये. महामारी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील आपले चार रेफ्रिजेरेटेड ट्रेलरपैकी दोन सक्रिय केले आहेत. मोठ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानंतर ट्रेलर सक्रिय केले जातात.
रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा
अमेरिकेत अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह बेड आणि कर्मचा-यांचा तुटवडा भासत आहे. फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना, टेक्सास आणि लुइसियानाच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. कोविडमुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.