काबूल – अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर बॉम्बस्फोटात १३ अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने पलटवार केला आहे. अमेरिकेने सांगितल्याप्रमाणे आयएसच्या दहशतवाद्यांवर हवाई हल्ला करून हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराला कंठस्नान घातले. अशा प्रकारे अमेरिकेने काबूल बॉम्बस्फोटाच्या ४८ तासांतच आपल्या तेरा सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. पेंटागनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने मानवरहित विमानाच्या माध्यमातून आयएस या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ले केले करून सूत्रधाराला ठार केले. यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ता म्हणाले, मानवरहित हवाई हल्ला अफगाणिस्तानच्या नंगहर प्रांतात करण्यात आला. यामध्ये कोणत्याही सामान्य नागरिकाला ईजा झाली नाही.
अमेरिकी दूतावासाचा इशारा
यापूर्वी अमेरिकेने काबूल विमानतळावर आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली होती. अमेरिकी नागरिकांना इशारा देताना अफगाणिस्तानातून त्वरित निघण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काबूल हवाई प्रवास न करण्याचा इशाराही दिला आहे. जे लोक अबे, पूर्व, उत्तर आणि मिनिस्ट्री ऑफ इंटिरिअर दरवाजांवर असलेल्या नागरिकांना त्वरित निघण्याच्या सूचना केल्या आहेत.
आणखी एका हल्ल्याचा धोका
आत्मघातकी हल्ला झालेल्या काबूल विमानतळावर आणखी एक हल्ल्याचा धोका आहे. दहशतवादी आणखी एक कट रचत आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. ब्रिटेन आणि स्वीडन या देशांनीही हल्ल्याची शक्यता वर्तविली आहे. अमेरिकेच्या ब्रॉडकास्ट कंपनीच्या म्हणण्यानुसार, उत्तर दरवाजावर क्षेपणास्त्राने हल्ला होऊ शकतो. दरम्यान, काबूलहून १६ तासांनंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता उड्डाणे सुरू झाली होती.