वॉशिंग्टन : गेल्या दीड वर्षापासून जगभरातील अनेक देशात कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. मात्र काही देशांमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना अमेरिकेमध्ये मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत कोरोनाची नवी रुग्ण प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत येथे १ लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आठ महिन्यांत देशातील नवीन कोरोना रुग्णांची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे.
अमेरिकेमध्ये डेल्टा प्रकारांची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशात समोर येणाऱ्या प्रकरणांमध्ये त्याचा सर्वात मोठा हात आहे. याशिवाय देशातील रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या मुलांची संख्याही या काळात वाढली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सध्या सुमारे २ हजार मुले रुग्णालयात दाखल आहेत. यामुळे देशातील कोरोनाची प्रकरणे मागील महिन्याच्या तुलनेत दुप्पट झाली आहेत, असे मत अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्याआकडेवारीनुसार, गेल्या महिन्यापर्यंत देशातील सरासरी ५०० रूग्ण दररोज रुग्णालयात दाखल होत होते. यापूर्वी यंदा ६ जानेवारी रोजी देशात सर्वाधिक १ लाख ३२ हजार प्रकरणे नोंदली गेली होती. तर दि. २८ जून रोजी देशात सर्वात कमी १३ हजार ८०० प्रकरणे नोंदवली गेली होती. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने लशीकरण कार्यक्रमाला गती दिली. मात्र जुलैनंतर देशात डेल्टा प्रकार वेगाने वाढल्यानंतर अमेरिकेतील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
दक्षिण अमेरिका सध्या कोरोनाचे केंद्रबिंदू आहे. कोणत्या राज्यात सर्वाधिक प्रकरणे आहेत याबद्दल आपण बोललो तर फ्लोरिडाचे नाव आघाडीवर आहे. पुढे टेक्सास आणि नंतर कॅलिफोर्नियाचे नाव येते. अलाबामा, फ्लोरिडा आणि जॉर्जियामधील रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात सुमारे ९५ टक्के बेड पूर्णपणे भरले आहेत. तर आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्रकाराचा प्रादुर्भाव अमेरिकेच्या त्या राज्यांमध्ये झपाट्याने वाढत असून तेथे लशीकरणाची गती अत्यंत मंद आहे. त्यामुळे केवळ तेच लोक जास्त संसर्गाच्या कक्षेत येत आहेत ज्यांना आतापर्यंत लशीकरण केले गेले नाही. याशिवाय देशातील रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या मुलांची संख्याही या काळात वाढली आहे. विभागाच्या माहितीनुसार सध्या सुमारे दोन हजार मुले रुग्णालयात दाखल आहेत. एकट्या कॅलिफोर्निया, फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये सुमारे ३२ टक्के मुले रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे अमेरिकन सरकारच्या चिंतेत कोरोनामुळे पुन्हा भर पडली आहे.