वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेत अमेरिकेच्या १३ जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १२ नौदलाचे जवान आणि नौदलातील एका वैद्यकीय कर्मचार्याचा समावेश आहे. या बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणतेही अभियान रोखणार नाही असे सांगत अमेरिकी नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची मोहीम सुरूच राहील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी केली आहे.
काबूल बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर बायडेन यांनी दहशतवाद्यांना उघड आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “आम्ही कोणालाही माफ करणार नाही. आम्ही एका एकाला निवडून मारू. याचा परिणाम भोगावा लागेल. काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यात तालिबान आणि इस्लामिक स्टेट यांनी सोबत मिळून कट रचल्याचा अद्याप कोणताच पुरावा मिळाला नाही.”
अमेरिकेचे दोन अधिकारी सांगतात, अमेरिकेचे ६० हून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले, की विमानतळाजवळ दोन आत्मघातकी हल्लेखोर आणि बंदुकधार्यांनी गर्दीवर हल्ला केला. त्यामध्ये कमीत कमी १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत.
भारत, संयुक्त राष्ट्रांकडून निंदा
काबूल बॉम्बस्फोटाच्या घटनेची भारताने निंदा केली आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनिओ गटरेस यांनीसुद्धा या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची मोहीम सुरूच ठेवली जाणार आहे, असे निक्षून सांगत ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
आयएसचा कट ः अमेरिका
अमेरिकेच्या एका सैन्य अधिकार्यांनी सांगितले, की काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यामागे निश्चितच आयएसचा कट आहे. इस्लामिक स्टेट ही संघटना तालिबानपेक्षाही क्रूर आणि कट्टर आहे. आयएसने अनेक सामान्य नागरिकांवरही हल्ले केले आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस-के या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.