इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गदर आणि कहो ना प्यार है सारखे सुपरहिट चित्रपट देणारी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर अखेर तिने मोठा खुलासा केला आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. २३ एप्रिल रोजी अमिषा पटेलला खंडवा येथील नवचंडी देवीधाम येथे होणाऱ्या स्टार नाईटमध्ये परफॉर्म करण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र ती केवळ ३ मिनिटेच स्टेजवर थांबली. यासाठी आयोजकांनी तब्बल ५ लाख रुपये अमिषाला दिले. त्यामुळे इतक्या कमी वेळ दिल्याने आयोजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खांडव्यातील प्रसिद्ध नवचंडी देवीधाम येथे आयोजित मेळ्याच्या समारोप समारंभात दरवर्षी फिल्म स्टार नाइट आयोजित केली जाते. कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून येथे फिल्म स्टार नाईट आयोजित होऊ शकली नाही. या वेळी नवचंडी देवीधामचे महंत बाबा गंगाराम यांनी जत्रेच्या समारोपप्रसंगी स्टार नाईटचे आयोजन केले होते. चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेलला पाच लाख रुपये देऊन येथे कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. पण अमीषा पटेल तिच्या सुपरहिट चित्रपट ‘कहो ना प्यार है’च्या टायटल सॉंगवर परफॉर्म करून स्टेजवरून खाली उतरली आणि निघून गेली.
खांडव्यातील समाजसेवक सुनील जैन यांनी अभिनेत्री अमिषा पटेलच्या या वृत्तीवर आक्षेप घेत, ही खांडव्यातील लोकांची फसवणूक आहे, त्यांचा अपमान आहे, असे म्हटले आहे. त्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अभिनेत्री अमिषा पटेलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. हा कार्यक्रम २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता होणार होता. तिला कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला रात्री ९.४५ वाजले. प्रेक्षकांनी इतका वेळ प्रतीक्षा करुनही ती स्टेजवर तीन मिनिटेच थांबली.
सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन यांनी सांगितले की, अमिषा पटेलचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. तिने किशोर कुमार यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेणं आणि नवचंडीला देवीधामचेही दर्शन घेणं अपेक्षित होतं. मात्र तिने किशोर कुमार यांच्या समाधीचे दर्शनही घेतले नाही आणि शूज घालूनच नवचंडी देवीधामला भेट दिली. यामुळे आमच्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही अर्ज केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
फसवणुकीच्या तक्रारीमुळे अमिषा देशभरात चर्चेला आली आहे. आता तिने यासंदर्भात प्रतिक्रीया दिली आहे. ती म्हणाली की, जिवाच्या भीतीने मी तेथून लगेच निघाले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत वाईट पद्धतीने करण्यात आलं होतं. त्यामुळे मला खुप भीती वाटत होती. मात्र, मी स्थानिक पोलिसांचे खुप आभार मानते. त्यांनी मला खुप चांगलं सहकार्य केले आणि मला सुखरुप तेथून बाहेर पडता आलं, असे अमिषाने म्हटलं आहे.
https://twitter.com/ameesha_patel/status/1518271247708471296?s=20&t=84bqD5Xx7c_00bbNflAy8g