कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबरनाथमध्ये एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. कारण ज्याच्यावर गोळीबार झाला, त्याच्याच गावठी कट्ट्यातून त्याला गोळी लागली. म्हणजे तोच आरोपी निघाला, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात कट रचण्यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.
नक्की काय घडले होते
अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत ढाबा परिसरात अलोक आणि त्याचे काही मित्र या ठिकाणी एकत्र आले होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून विवेक नायडू यांचा बदला घेण्यासाठी आलोक यादव, चंदन भदोरिया आणि रोहित सिंह पुना हे मित्र याठिकाणी येऊन विवेकच्या हत्येचा कट रचण्यासाठी कल्याणहुन बदलापूरला आले होते. विवेक नायडू यानं काही दिवसांपूर्वी चंदन यांच्या भावावर कल्याणच्या काळा तलाव या ठिकाणी गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक फरार झाला होता. याच वेळी चंदन भदोरिया यांच्या हातातील गावठी कट्ट्यामधून गोळी सुटली आणि ती थेट अलोक याच्या उजव्या मांडीत घुसली. अतिश आणि त्याच्या मित्राने या भागातून पळ काढला.
कसून चौकशीमुळे
चंदन भदोरिया आणि रोहित सिंह पुना यांनी जखमी अलोकला सर्वात आधी जेके हॉस्पिटल कल्याण येथे रिक्षातून नेले, त्यानंतर उल्हासनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये अलोकला आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण प्रकार लक्षात घेत गुन्हा दाखल केला होता. मात्र यामध्ये आलोक आणि त्याच्या साथीदाराने खोटा बनाव रचून अलोकवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना अलोकसोबतच्या मित्रांची कसून चौकशी केली. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणातील जखमी आरोपी अलोक यादव, रोहित सिंह पुना आणि मुख्य आरोपी चंदन भदोरिया या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले आहे.
असा होता कट
खरे म्हणजे मित्रांनी अंबरनाथ पश्चिम भागातील गणपत धाब्याजवळ एकत्र येत विवेकला संपवण्याचा कट रचला. हे सर्वजण आधी बारावी डॅमच्या एका फार्म हाऊसवर पार्टी करून बुलेट आणि पल्सर मोटरसायकल वरून कल्याणला जात होते. मात्र अंबरनाथच्या गणपत धाब्यासमोर आतिश पवार आणि त्याचा मित्र त्यांना भेटला. या अतिशसोबत चंदन याची बाचाबाची झाली चंदन भदोरियाने स्वतःजवळ असलेला गावठी कट्टा काढून विवेक नायडू याला याबाबतची माहिती दे नाहीतर तुला जीवे ठार मारणार, अशी धमकी दिली होती. याच वेळी चंदन भटोरिया यांच्या हातातील गावठी कट्ट्यामधून एक गोळी फायर होऊन अलोक याच्या उजव्या मांडीत घुसली. यावेळी अतिश आणि त्याचा मित्र हे या भागातून पळून गेले होते.