नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल भूखंडाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना उद्योजकांकडून बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत उद्योजकांकडून भूमिपूजन करण्यात आले असून न्यायप्रविष्ट बाब असतांना याठिकाणी काम कसे सुरू करण्यात आले असा सवाल नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच एमआयडीसीकडून वारंवार वाहतुकदारांची मुस्कटदाबी करण्यात येणार असेल तर ती सहन केली जाणार नाही असा इशारा देखील नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम. सैनी यांनी पत्राद्वारे नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक आयुक्त नितीन गवळी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.
अंबड एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र सदर भूखंड एमआयडीसीकडून खाजगी उद्योजकाला विकण्यात आला असून ट्रक टर्मिनलला इतरत्र हलविण्यात येत आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टच्या वतीने हरकत घेण्यात आली आहे. यासाठी वारंवार पत्रव्यवहार देखील केला आहे. तसेच याबाबत मा. कोर्टात केस दाखल केलेली असून त्याची सुनावणी प्रक्रिया देखील सुरू आहे. अंबड एमआयडीसीतील ट्रक टर्मिनल राखीव भूखंडाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना उद्योजकांकडून घाईघाईत भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच याठिकाणी बांधकाम देखील सुरू करण्यात येत आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना भूखंडावर भूमिपूजन करून बांधकाम कसे करण्यात येत आहे असा सवाल नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने उपस्थित करण्यात आला असून याबाबत एमआयडीसी विभागाकडे खुलासा देखील मागविण्यात आला आहे.