नाशिक – येथील अंबड औद्योगिक वसाहतीत एक्सलो पॉईंट येथे आज पहाटे एक भीषण अपघात झाला. आयशर ट्रकवर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडी रस्त्याच्या कडेला असलेले शेड तोडून शेतात शिरली. तर या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज बुधवारी (८ डिसेंबर) सकाळी सहा वाजेच्या सुमारास या अपघाताची नोंद झाली आहे.
गरवारे पॉईंट कडून एक्सलो पॉईंटच्या दिशेने आयशर ट्रक (एम एच १५ सि टी १८२२) येत होता. एक्सलो पॉइंटजवळ गाडी आली असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी गाडी समोरील टेम्पो स्टॅन्ड समोरील शेड तोडून थेट शेतात शिरली. गाडीचा वेग अधिक असल्याने या अपघातात आयशर चालक राहुल राम ईकबाल (३०, रा. दत्त नगर चुंचाळे, नाशिक) याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम शेळके करीत आहेत .