नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती घेतला. या कामामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेत भर पडणार आहे.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सल्लागार अमृत देशमुख यांच्या पुढाकाराने आज अंबड एमआयडीसी परिसरातील खड्डे बुजविण्याची ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम. सैनी, चेअरमन राजेंद्र फड, सचिव बजरंग शर्मा, उद्योजक चंद्रशेखर भोसले, चेतन कुमार शितोळे, कुंदन दरांगे, दलबीर प्रधान, सुभाष जांगडा, दिपक ढिकले, अशोक पवार, तेजपाल सोढा, राजेश इसरवाल, राजेश शर्मा, विजय लहामगे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे आरोग्य धोक्यात येत होते, तसेच वाहनांचे नुकसान होऊन अपघातांची शक्यता वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घेत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने रस्त्यांची डागडुजी केली. “फक्त प्रशासनाकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी आपणही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, याच भावनेतून हा उपक्रम राबविला,” असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाचे अंबड एमआयडीसी परिसरातील उद्योग, व्यावसायिक तसेच नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या या कार्याची सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.