नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) रविवारी होणा-या निवडणुकीत चांगली चुरस वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजत आहे. निवडणूक आयमाची असली तरी या निवडणुकीवर निमाचा इम्पॅक्ट आहे. निमाच्या सत्ताधारी सदस्यांचा कारभार, त्यानंतर निवडणुकीसाठी रंगलेलेले राजकारण यामुळे त्याचा परिणामही आयमाच्या निवडणुकीवर होत आहे. त्याचा फायदा आता नेमका कुणाला मिळतो हे महत्वाचे आहे. उद्योजकांच्या या निवडणुकीत राजकारणाने अगोदरच शिरकाव केल्यामुळे उद्योजक सभासदांमध्ये संताप असून त्याचा कोणाला फटका बसतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
आयमाच्या निवडणुकीत ३० जागांसाठी एकूण ५९ उद्योजक उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी एकता पॅनलने ३० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर विरोधी गटाने उद्योग विकास पॅनलची स्थापना करुन २९ उमेदवारांना उभे केले आहे. एकता पॅनलचे नेतृत्व धनजंय बेळे आणि वरुण तलवार हे करत आहेत. त्यांच्या पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी निखिल पांचाळ तर सेक्रेटरीपदासाठी मनिष बुब हे रिंगणात आहे. तर उद्योग विकास आघाडीचे नेतृत्व शशिकांत जाधव आणि तुषार चव्हाण करीत असून या पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी संजय महाजन तर सेक्रेटरीपदासाठी एन.डी. ठाकरे रिंगणात आहेत.
रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान
आयामची ही निवडणूक २०२२-२०२४ या वर्षाकरिता निवडणूक रविवार (३० जानेवारी) रोजी होणार आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या आयमा निवडणुकीसाठी मतदारांना मतदान करताना आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. तसेच कोविड-१९ नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगद्वारा सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयमा निवडणूक समितीने सभासदांना केले आहे. यात मतदाराने आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याची मूळ प्रत तसेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले सर्टिफिकेट दाखवणे आवश्यक आहे. नो मास्क, नो एन्ट्री असणार आहे. सॅनिटायझर वापर करणे आवश्यक आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी मतदारांनी घ्यावी. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक समितीने केले आहे.
उद्योग विकासने केले आरोप
कंपन्यांच्या नावाने आपल्याच कुटुंबातील सदस्याचे नाव मतदार यादीत सत्ताधारी गटाने समाविष्ट केल्याचा आरोप उद्योग विकास पॅनलचे नेते तुषार चव्हाण व श्रीपाद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मात्र आमच्याकडे कुठलीही अशी तक्रार आली नसल्याचे निवडणूक समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आता निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने याबाबत कुठलाही विचार करता येणार नसल्याचे निवडणूक समिती सदस्य विवेक गोगटे, डी.जी.जोशी यांनी सागितले.