हटके चित्रपटांची मेजवानी
राज्यात सध्या मिनी लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या अनेक जण घरातच आहेत. अशातच एक चांगली संधी आहे. ती म्हणजे अॅमेझॉन प्राईमवरील दोन हटके चित्रपट पाहण्याची. कोणते आहेत ते चित्रपट आणि कशासाठी बघायचे…
The Last Colour and The Great Indian Kitchen.
पुन्हा लॉकडाऊन सुरु झालं मग हातात रिमोट घेऊन जरा निवांत बसून काहीतरी छान बघू या असा विचार केला तर Amazon Prime वर हे दोन सिनेमे दिसले. तसेही सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे वाळवंटातील ओअॅसिस ! छोटे असल्या कारणाने एका दिवसात दोन बघून झाले.
तर पहिला The last colour हा सुप्रसिध्द इंडियन आणि अमेरिकन शेफ विकास खन्ना यांच्या the last colour या कादंबरीवर आधारित आणि त्यांनीच दिग्दर्शीत केलेला हा चित्रपट सुरु होतो वाराणसीच्या गंगेच्या घाटावर. एक नऊ वर्षांची छोटी नावाची चुणचुणीत मुलीची ही गोष्ट आहे. जी घाटावर पणत्या विकते, दोन काठ्यांना बांधलेल्या दोरावर चालते.
तीला शाळेत जायचंय, खूप शिकायचंय आणि त्यासाठी तीला ३०० रुपये जमवायचेत. यासाठी तीला मदत करत असतो तिच्याच वयाचा चिंटू.अशातच एक दिवस छोटीला घाटावर भेटते नूर. नूर विधवा असते आणि ती पण घाटावरील एका विधवा आश्रमात राहत असते. नूर आणि छोटीची छान गट्टी जमते. नेहमी श्वेत साडी घालणाऱ्या नूरला छोटी विचारते तुझा आवडता रंग कोणता, नूर सांगते गुलाबी जयपूरच्या राजघराण्यातल्या स्त्रिया परिधान करतात तो गुलाबी.
आयुष्याचे सगळे रंग उडालेल्या नूरला छोटी म्हणते, “ इस होलीपे आप पर गुलाबी रंग पडेगा, ये वादा रहा हमारा आपसे.” करते छोटी तिचा वादा पूर्ण ? खूप शिकण्याचं तिचं स्वप्न, काय होतं त्याचं ? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरा साठी चित्रपट बघायलाच हवा. वाराणसीचे घाट तर असेही सुंदर आहेत. पण चित्रपटात खूपच सुंदर वाटतात. नूरच्या भूमिकेत नीना गुप्ता एकदम परफेक्ट पण Aqsa Siddiqui ने उभी केलेली छोटी मनात घर करते. तिचा निरागस चेहरा, संवाद म्हणण्याची शैली आणि एकूणच तिचा पडद्यावरचा वावर अप्रतिम. आवर्जून बघावा असा the last colour.
—-