इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेझॉनच्या स्थापनेपासून देशात ११.६ लाखा पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अमेझॉन इंडिया मार्फत आज जाहीर करण्यात आले. अमेझॉनने येथील उद्योगांना जवळपास ५ अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यास सक्षम केले आहे. तर ४० लाखांहून अधिक एमएसएमईचे डिजिटायझेशन केले आहे.जानेवारी २०२० मध्ये अमेझॉन संभव या वार्षीक कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीत कंपनीने २०२५ पर्यंत देशातील १ कोटी एमएसएमईचे डिजिटायझेशन, १० अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यास उद्योगांना सक्षम करणे आणि २० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे वचन दिले होते. या वचनांची दुप्पट पद्धतीने पुर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला आढावा अमेझॉनकडून घेण्यात आला.
अमेझॉन संभव २०२१ मध्ये अमेझॉनने २५० मिलियन डॉलर्स अमेझॉन संभव व्हेंचर फंडची घोषणा केली होती. या फंडच्या माध्यमातून स्टार्टअप्स आणि उद्योजकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तंत्रज्ञान व नवकल्पनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. एसएमबी डिजिटायझेशनच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या उद्योजकांना आणि स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यावर हा निधी केंद्रित केला जाणार आहे. फंडाचा भाग म्हणून अमेझॉनने आधीच मायग्लॅम , एमवनएक्सचेन्ज आणि स्मॉल केस मध्ये गुंतवणूक केली आहे.अमेझॉन फंडाद्वारे उच्च दर्जाची नवकल्पना आणि उद्योजकीय ऊर्जा या क्षेत्रांमध्ये फोकस करून गुंतवणूक करण्यासाठी आपल्या लोकांचा आणि तंत्रज्ञान संसाधनांचा लाभ देण्यास
अमेझॉन वचनबद्ध आहे.
एमएसएमईचे डिजिटायझेशन, प्रादेशिक बाजारपेठा जोडणे आणि देशातून निर्यात वाढवण्यासाठी अमेझॉनचे प्रयत्न येथील अर्थव्यवस्थेत हजारो उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यास मदत करीत आहेत. गेल्या एका वर्षात अमेझॉनने उद्योगांमध्ये १ लाख ३५ हजार पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. या नोकर्या आयटी, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, उत्पादन, कंटेंट तयार करणे, कौशल्य विकास आणि इतर अप्रत्यक्ष नोकर्या यांसारख्या उद्योगांमध्ये आहेत. अमेझॉनने विक्रेत्यांचा समुदाय निर्माण करण्यास मदत केली आहे.
अमेझॉन ने २०० हून अधिक देश आणि प्रदेशांमधील ग्राहकांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, भारतीय व्यवसायांना मदत करण्यासाठी, भारतातून जागतिक ब्रँड तयार करण्यासाठी ग्लोबल सेलिंगद्वारे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या उपक्रमाला वेग आला असून आज त्यात १ लाखांपेक्षा जास्त निर्यातदार आहेत. या सर्वांची एकत्रित निर्यात ५ अब्ज डॉलर्स पार करण्याच्या मार्गावर आहेत. अमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोग्रामला पहिल्या १ अब्ज डालर्सची एकत्रित निर्यात करण्यासाठी तीन वर्षे लागले. तर शेवटच्या दोन अब्ज डॉलर्सची निर्यात होण्यास केवळ १७ महिने लागले आहेत.
विविध वस्तुंचे विक्रेते, कारागीर, विणकर, डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक सेवा देणारे भागीदार यांच्यासह देशातील ४ दशलक्षाहून अधिक एमएसएमई अमेझॉनसोबत काम करतात. किरकोळ दुकानांसारखे लहान व्यवसाय, कारागीर आणि तळागाळातील उद्योजकांसह अनेकांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि स्वतःचा विस्तार करण्यासाठी कंपनीचे डिजिटायझेशन महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे या सर्वांची प्रगती होत आहे. लहान व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी जुलै २०२१ मध्ये अमेझॉनने डिजिटायझेशनचे फायदे सांगत सुरतमध्ये पहिले डिजिटल केंद्र उघडले. केंद्राने डिजिटायझेशनच्या प्रवासात सुरत आणि जवळपासच्या परिसरातील ४००० हून अधिक लहान व्यवसायांना सेवा दिली आहे.
अमेझॉन इंडियाचे ग्राहक व्यवसायाचे देशातील व्यवस्थापक मनीष तिवारी म्हणाले की, २०१३ साली अमेझॉन डाँट इन सुरू झाल्यापासून आम्ही आत्तापर्यंत एकत्रितपणे ११ . ६ लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. तर व्यवसायिकांना जवळपास ५ अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यास सक्षम केले आहे. तसेच देशातील ४० लाख एमएसएमईचे डिजिटायझेशन केले आहे. आम्ही संपूर्ण देशातील एमएसएमईसोबत काम करणे सुरू ठेवत आहोत. नवीन साधने, तंत्रज्ञान आणि नावीन्य आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे देशातील व्यवसायांमध्ये उद्योजकता निर्माण होईल. देशातून निर्यातीला चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होतील. आम्हाला पुर्ण विश्वास आहे की, तंत्रज्ञान आणि मोबाईल इंटरनेट देशाच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम करेल. भारताच्या डिजिटल परिवर्तनामध्ये आणि आधुनिक भरभराट होत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये अमेझॉन मोठी भूमिका बजावत आहे.