इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न होऊन तीस-तीस वर्ष लोटतात तरी स्वतःचं घर घेताना मध्यमवर्गीय माणसाचं कंबरडं मोडून जातं. पण आपल्या सोयीसुविधांसाठी हाच मध्यमवर्गीय माणूस ज्या कंपनीचा आधार घेतो, त्या कंपनीच्या मालकाने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी साडेपाच अब्ज रुपयांचे घर खरेदी करून अख्ख्या जगाचे लक्ष वेधले आहे.
जेफ बेझॉस याच्या नावाचा उल्लेख झाला तरी श्रीमंत झाल्यासारखे वाटावे एवढा तो धनाढ्य आहे. अमेझॉनच्या माध्यमातून जगभरात जाळे पसरविणाऱ्या जेफ बेझॉसने अलीकडेच त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी आलीशान घर खरेदी केलं आहे. हे घर साधे सुधे समजू नका. हे घर एका बेटावर असून त्याची श्रीमंती फोटो बघितला तरीही लक्षात येते. फ्लोरिडामधल्या इंडियन क्रीक आयलंडवर प्रतिष्ठित ‘बिलेनियर बंकर एन्क्लेव्ह’मध्ये ६८ दशलक्ष डॉलर्स (५ अब्ज ६५ कोटी, ४० लाख, ४० हजार २०० रुपये) मोजून आपल्या होणाऱ्या पत्नीकरिता अत्यंत आलिशान घर विकत घेतल्याचं समजतं.
पुन्हा घरी आल्याची भावना
बेझॉस यांनी लॉरेन सँचेझ यांना २५ लाख डॉलर्स मूल्याची डायमंड रिंग घालून प्रपोझ केलं आणि त्यानंतर महिनाभराने त्यांनी हे आलिशान घर खरेदी केल्याची बातमी आली आहे.अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांना अत्यंत उच्चभ्रू प्रकारच्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीज खरेदी करण्यामध्ये, त्यांमध्ये गुंतवणूक करण्यात रस आहे. १९८२ साली बेझॉस मियामीमधल्या पामोट्टे सीनिअर हायस्कूलमधून ग्रॅज्युएट झाले होते. त्यामुळे आता त्यांनी फ्लोरिडाच्या मियामी भागातल्या इंडियन क्रीक आयलंडवर घेतलेल्या नव्या प्रॉपर्टीमुळे त्यांना पुन्हा घरी आल्याची भावना अनुभवता येणार आहे
स्वतंत्र यंत्रणा
जेफ बेझॉसच्या घरात तीन बेडरूम्स आणि तीन बाथरूम्स असून, एकूण क्षेत्रफळ ९ हजार २५९ स्क्वेअर फूट आहे. ही सगळी प्रॉपर्टी २.८ एकर क्षेत्रावर वसलेली असून, मानवनिर्मित बॅरियर आयलंडच्या रूपाने प्रायव्हसी आणि एक्स्लुझिव्हिटी तिथे मिळते. त्या क्षेत्रात स्वतंत्र म्युनिसिपालिटी, महापौर आणि पोलीस आहेत.
सगळेच सेलिब्रिटी
या बेटावर राहणारे सगळेच सेलेब्रिटी आहेत. त्यात टॉम ब्रॅडी, इव्हांका ट्रम्प, जेरेड कुश्नर, कार्ल इकॅन्ह, स्पॅनिश गायक ज्युलिओ इग्लेशियस आदींचा त्यात समावेश आहे.इंडियन क्रीक आयलंडवर आलिशान घरं आहेत. त्यात ४० वॉटरफ्रंट प्रॉपर्टीज असून, २९४ एकरवर पसरलेलं १८-होल गोल्फ कोर्स आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या बेटाची लोकसंख्या फक्त ८१ आहे.