इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे नियमांचे पालन न करणाऱ्या उत्पादनांच्या वितरणाला आळा घालण्यासाठी, भारतीय मानक ब्युरो (BIS) ने लखनौ, गुरुग्राम आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या अनेक गोदामांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे.
७ मार्च २०२५ रोजी लखनौमधील एका अॅमेझॉन गोदामावर टाकलेल्या अलिकडच्या छाप्यात, बीआयएसने ज्या सर्वांकडे अनिवार्य बीआयएस प्रमाणपत्र नव्हते अशी २१५ खेळणी आणि २४ हँड ब्लेंडर जप्त केले. यापूर्वी, फेब्रुवारी २०२५ मध्ये, गुरुग्राममधील एका अॅमेझॉन गोदामात अशाच प्रकारच्या कारवाईत ५८ अॅल्युमिनियम फॉइल, ३४ धातूच्या पाण्याच्या बाटल्या, २५ खेळणी, २० हँड ब्लेंडर, ७ पीव्हीसी केबल्स, २ फूड मिक्सर आणि १ स्पीकर जप्त करण्यात आला होता. हे सर्व प्रमाणित नसल्याचे आढळून आले होते. त्याचप्रमाणे, इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे संचालित गुरुग्राममधील फ्लिपकार्ट गोदामावर टाकलेल्या छाप्यात, बीआयएसने ५३४ स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या (व्हॅक्यूम इन्सुलेटेड), १३४ खेळणी आणि ४१ स्पीकर जप्त केले. या सर्व वस्तु प्रमाणित नव्हत्या. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हींवरील अनेक उल्लंघनांच्या बीआयएसच्या तपासात टेकव्हिजन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडकडे बिगर-प्रमाणित उत्पादने आढळली.
या माहितीच्या आधारे, बीआयएसने दिल्लीतील टेकव्हिजन इंटरनॅशनलच्या दोन वेगवेगळ्या सुविधांवर छापे टाकले, ज्यामध्ये बीआयएस प्रमाणपत्र नसलेले अंदाजे ७००० इलेक्ट्रिक वॉटर हीटर, ४००० इलेक्ट्रिक फूड मिक्सर, ९५ इलेक्ट्रिक रूम हीटर आणि ४० गॅस स्टोव्ह आढळले. जप्त केलेल्या गैर-प्रमाणित उत्पादनांमध्ये डिजिस्मार्ट, अॅक्टिव्हा, इनालसा, सेलो स्विफ्ट, बटरफ्लाय इत्यादी ब्रँडचा समावेश आहे.
जप्त केलेल्या साहित्यानंतर, संबंधित घटकांना जबाबदार धरण्यासाठी BIS ने BIS कायदा, २०१६ अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. BIS ने BIS कायदा, २०१६ च्या कलम 17 (1) आणि 17 (3) चे उल्लंघन केल्याबद्दल मेसर्स टेकव्हिजन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध आधीच दोन न्यायालयीन खटले दाखल केले आहेत. इतर जप्ती कारवाईसाठी अतिरिक्त खटले दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत. BIS कायदा, 2016 च्या कलम 17 अंतर्गत, दोषींना दोन लाख रुपयांपेक्षा कमी दंड होऊ शकतो, जो विक्रीसाठी किंवा विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंच्या किमतीच्या दहा पटी पर्यंत वाढू शकतो. शिवाय, उल्लंघनाच्या तीव्रतेनुसार, गुन्हेगारांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह बाजारात उपलब्ध ग्राहक उत्पादने, वापर करतानाची सुरक्षा व्यवस्था आणि गुणवत्ता मानकांचे पालन करत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) सक्रियपणे बाजारावर लक्ष ठेवून आहे. लक्ष ठेवण्याचा भाग म्हणून, BIS विविध ग्राहक उत्पादने खरेदी करते आणि विहित मानकांचे अनुपालन झाले आहे का ते पहाण्यासाठी त्यांची कठोर चाचणी घेत असते.
बाजार निरीक्षण करण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये घरगुती प्रेशर कुकर, हँड ब्लेंडर, मिक्सर, इलेक्ट्रिक इस्त्री, रूम हीटर्स, पीव्हीसी केबल्स, गॅस स्टोव्ह, खेळणी, दुचाकीचे शिरस्त्राण (हेल्मेट), बटणे , सॉकेट्स आणि खाद्यान्न पॅक करण्यासाठी वापरात असलेल्या ॲल्युमिनियम फॉइल्स यासारख्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश होतो.निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन केंद्र सरकारने सार्वजनिक हितासाठी या उत्पादनांना BIS प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
तथापि, जरी या उत्पादनांसाठी BIS प्रमाणन अनिवार्य केले गेले असले तरीही अनेक बिगर-प्रमाणित उत्पादने,ज्यात ISI मार्क नसलेल्या किंवा अवैध परवाना क्रमांकासह (CM/L क्रमांक) ISI मार्क नसलेल्या उत्पादनांचा समावेश होतो अशी उत्पादने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकली जात आहेत उदाहरणार्थ ऍमेझॉन, फ्लिपकार्ट,मीशो मिंत्रा,बिग बास्केट हे बीआयएसने त्यांच्या पाळत ठेवण्याच्या उपक्रमादरम्यान, BIS ने ओळखले आहे. ही बिगर-प्रमाणित उत्पादने ग्राहकांच्या सुरक्षिततेत महत्त्वपूर्ण धोके निर्माण करतात कारण त्यांनी किमान सुरक्षितता आणि कार्यप्रदर्शन मानकांची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र तृतीय-पक्ष चाचणी घेतलेली नाही.
अशा या मोठ्या प्रमाणावरील जप्ती असुरक्षित बिगर-प्रमाणित उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीच्या व्यापक समस्येवर प्रकाश टाकतात, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी तातडीची गरज अधोरेखित करतात आणि केंद्र सरकारद्वारे जेथे अनिवार्य असेल तेथे फक्त BIS-प्रमाणित उत्पादने विक्रीसाठी सूचीबद्ध आहेत याची खात्री करण्यासाठी अधिक योग्य परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात, BIS ने या सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना नोटिसा जारी केल्या आहेत आणि त्यांना BIS प्रमाणन आवश्यक असलेली उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यापूर्वी रीतसर प्रमाणित आहेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
BIS ग्राहकांना BIS केअर ॲपचा वापर करून माहितीपूर्ण खरेदीचे निर्णय घेण्याचे आवाहन करते.हे ॲप ग्राहकांना अनिवार्य BIS प्रमाणन आवश्यक असलेल्या उत्पादनांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करते आणि त्यांना ISI मार्क आणि निर्मात्याचा परवाना क्रमांक (CM/L) तपासून उत्पादनाच्या BIS प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्याची परवानगी देते. याव्यतिरिक्त, ग्राहक ISI मार्क नसलेल्या उत्पादनांबद्दल तक्रारी नोंदवण्यासाठी किंवा BIS-प्रमाणित उत्पादनांच्या गुणवत्तेची चिंता नोंदवण्यासाठी BIS केअर ऍप वापरू शकतात. अधिक माहितीसाठी, ग्राहक www.bis.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.