मुंबई – जगातील प्रत्येक देशात गुन्हेगारी नियंत्रणासाठी विशेष कायदे तयार केले आहेत. गुन्हा लहान असो अथवा मोठा, त्या त्या देशांच्या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांना शिक्षा ठोठावली जाते. काही गुन्हेगारांना दंड भरावा लागतो, तर काही गुन्हेगारांना कारागृहात राहण्याची वेळ येते. पण एखाद्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची विचित्र शिक्षा दिल्यास काय होईल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला हैराण करणार्या अशा काही विचित्र शिक्षांबाबत माहिती देणार आहोत.
स्वतःच्या पायावर उभे रहा
स्पेनच्या एंडालुसियामध्ये राहणार्या एका २५ वर्षीय युवकाच्या आई-वडिलांनी त्याला पॉकेटमनी देणे बंद केले होते. त्यानंतर तो हे प्रकरण घेऊन न्यायालयात पोहोचला. परंतु आपल्या पालकांचे घर सोडून स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती.
गाढवासोबत मिरवणूक
२००३ मध्ये अमेरिकेच्या शिकागोमध्ये राहणार्या दोन मुलांना नाताळाच्या दिवशी सायंकाळी चर्चमध्ये येशूची मूर्ती चोरून तिचे नुकसान केले होते. या गुन्ह्यात दोषी आढल्यानंतर त्याला ४५ दिवसांचा कारावास ठोठावण्यात आला. त्याशिवाय त्याच्या गावी गाढवासोबत मिरवणूक काढण्याचा आदेशही देण्यात आला होता.
शास्त्रीय संगीत ऐका
बीबीसीच्या वृत्तानुसार, २००८ मध्ये अँड्र्यू व्हेक्टर यांना त्यांच्या कारमध्ये मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याच्या गुन्ह्याखाली १२० पाउंडचा दंड करण्यात आला होता. ते कारमध्ये त्यांच्या आवडीचा रॅप ऐकत होते. पण व्हेक्टर यांनी बिथोवन, बाख आणि शोपेन यांचे शास्त्रीय संगीत ऐकण्याच्या अटीवर दंडाची रक्कम ३० पाउंड करू असे न्यायाधीशांनी सांगितले.
चर्चमध्ये रहा
अमेरिकेच्या ओकलाहोमामध्येमधील १७ वर्षीय टायलर एलरेड मद्यपान करून वाहन चालवत असताना झालेल्या अपघातात त्याच्या मित्राचा मृत्यू झाला होता. ही घटना २०११ रोजी घडली होती. टायलर त्यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला महाविद्यालयीन आणि पदवी शिक्षण संपविण्याशिवाय वर्षभरात अमली पदार्थ, दारू आणि निकोटिनची चाचणी करण्यासह दहा वर्षांपर्यंत चर्चमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली होती.
कार्टुन पहा
अमेरिकेच्या मिसौरीमध्ये राहणार्या डेव्हिड बेरी नावाच्या व्यक्तीने शेकडो हरणांची शिकार केली होती. २०१८ मध्ये या गुन्ह्यात तो दोषी आढळला होता. न्यायालयाने त्याला एक वर्षापर्यंत कारागृहात राहून महिन्यातून किमान एकदा डिज्नीचे बांबी कार्टुन पाहण्याची शिक्षा सुनावली होती.