इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमावस्येला घाबरू नका, अंधश्रद्धा युक्त, अनिष्ट, अघोरी कर्मकांडे टाळावे असे आवाहन अंनिसचे केले आहे. उद्या गुरुवार २४ जुलै, २०२५ रोजी अमावस्या आहे. जारण- मारण ,मंत्र -तंत्र, जादूटोणा, करणी अशा गोष्टींवर विश्वास असणाऱ्या लोकांना ही अमावस्या महत्त्वाची वाटते. बऱ्याच वेळा नरबळी सुद्धा अमावस्येच्या दिवशी/रात्री दिले गेल्याची उदाहरणे आहेत. काही ठिकाणी अघोरी दरबार भरवले जातात. अंगात येणे, अंगात येणाऱ्यांवर अघोरी इलाज म्हणजे मारहाण करणे, कोपिष्ट दैवतांना बकरं-कोबडं यांचा बळी देणे, आजारी व्यक्ती लवकर बरी म्हणून भगत, मांत्रिक यांच्या आदेशानुसार उतारे,फातारे करून रस्त्यांवर, भर चौकांमध्ये रात्रीच्या वेळी ठेवणे, असे दहशत, भिती व अंधश्रद्धा पसरवणारे प्रकार अमावास्येच्या रात्री जास्त घडतात.
दुसऱ्या दिवशी सकाळीस अनेक ठिकाणी हे प्रकार आपल्या नजरेस पडतात. रस्त्यावरील अशा भीतीदायक वस्तू टाळण्याच्या प्रयत्नात अनेकांचे अपघात होतात. एकूणच काय तर उद्याची अमावस्या अघोरी, अंधश्रद्धा युक्त कर्मकांडे, काळी जादू करण्यासाठी अधिक महत्त्वाची मानली जाते. परिणामी उद्या अमावास्येच्या रात्री अंधश्रद्धांच्या माध्यमातून कुठलाही अनिष्ट, अघोरी गैरप्रकार, शोषण घडण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून कार्यकर्त्यांसह समाजसेवकांनी आपापल्या परिसरात बारीक लक्ष ठेवून असले पाहिजे.
दुसऱ्या दिवशी सकाळी भर रस्त्यात, चौकांमध्ये दैवी उतारा केलेल्या वस्तू आढळल्या तर त्या लोकांसमक्ष आदराने उचलाव्यात. त्याचवेळी तेथे असलेल्या लोकांसाठी योग्य ते प्रबोधन, मार्गदर्शन करावे. अशा अंधश्रद्धा युक्त कर्मकांडातील फोलपणा, निर्थकता स्पष्ट करावी. शास्त्रीय कारणमीमांसा करावी. त्याचा एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ काढावा. तो प्रबोधनासाठी व्हायरल करावा.
दैवी उताऱ्या सोबत असलेल्या सर्व वस्तू कार्यकर्त्यांनी सोबत घेऊन जाव्यात आणि निर्जन ठिकाणी त्यांचे यथायोग्य पद्धतीने विसर्जन करावे. मध्यपींनाही उद्याचा दिवशी अधिक संधी साधायची असते. कारण परवापासून श्रावण महिना सुरू होणार असतो. म्हणून कार्यकर्त्यांनी शक्य झाल्यास मद्यपींशी संवाद साधावा आणि त्यांचे प्रबोधन करावे. तेथेही थोडेफार यश मिळू शकेल.
दिवस- रात्र अमावास्या- पौर्णिमा, महिना -वर्ष याप्रमाणे उद्याची अमावस्या हा एक निसर्ग नियमाचा भाग आहे. मानवाने मानवाच्या सोयीसाठीच अशा गोष्टी निश्चित केलेल्या आहेत. त्याला कोणीही घाबरू नये. त्यासाठी कोणतेही अंधश्रद्धायुक्त अनिष्ट, अघोरी, कर्मकांड करण्याची गरज नाही , करू नये असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ज्य प्रधान सचिव डॉ . ठकसेन गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.