नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेच्या नाव नोंदणीला प्रारंभ झाला आहे. एकंदर ५६ दिवसांची ही यात्रा २८ जून ते २२ ऑगस्ट कालावधीत होणार आहे. पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गे ही यात्रा होणार आहे. जम्मू – काश्मीर बँक, पंजाब नँशनल बँक आणि येस बँकेच्या शाखांमधून यासाठी नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती श्री अमरनाथजी पवित्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वरकुमार यांनी दिली आहे.
यात्रा नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. केवळ राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय संस्था यांनी दिलेली आरोग्य प्रमाणपत्रे नोंदणीकृत बँक शाखांमध्ये स्वीकारली जातील.
कोविड १९ च्या नियमांनुसार १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या किंवा ७५ वर्षांपेक्षा जास्त आणि सहा आठवड्यांपेक्षा जास्त गरोदर असलेल्या स्त्रिया यासाठी नोंदणी करू शकणार नाहीत. नोंदणी आणि इतर माहिती www.shriamarnathjishrine.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ही यात्रा रद्द झाली होती. यंदा या यात्रेला ६ लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे.