अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अमरनाथ भक्तांसाठी आता यात्रा अधिक सुखकर होणार आहे. केंद्राच्या सूचनेवरून राज्य सरकारने श्रीनगर ते पंचतर्णी यात्रेकरूंना हेलिकॉप्टर सेवा देण्याची तयारी केली आहे. यापूर्वी ही सेवा पहलगाम आणि नीलग्रथ (बालताल) ते पंचतर्णीपर्यंत उपलब्ध होती. पंचतर्णी हा यात्रेचा शेवटचा मुक्काम मानला जातो आणि तेथून पवित्र गुहा सहा किलोमीटर अंतरावर आहे.
कोरोनामुळे श्री अमरनाथची वार्षिक यात्रा दोन वर्षांनंतर आयोजित केली जात आहे. यंदा ही यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. यात्रेसाठी सुमारे आठ लाख भाविक येऊ शकतील, असा श्राइन बोर्डाचा दावा आहे. मोठ्या संख्येने भाविकांची येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आवश्यक ती सर्व व्यवस्था करत आहे. त्यामुळेच भाविकांच्या मुक्कामाची व्यवस्थाही दुप्पट करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर विमानतळावरूनच हेलिकॉप्टर सेवा पुरविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने Mi-१७ हेलिकॉप्टरची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. सरकारच्या निर्णयामुळे इतर राज्यांतून थेट श्रीनगर विमानतळावर पोहोचणाऱ्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत भाविकांना रस्त्याने नीलग्रथ आणि पहलगाम गाठावे लागत होते. श्रीनगरपासून रस्त्याने बालटाल (नीलग्रथ) ९३ किमी आणि पहलगाम ९१ किमी अंतरावर आहे. भाविकांकडून होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता अधिक सोय उपलब्ध झाल्यास यात्रेकरू पवित्र गुहेपर्यंत सहज पोहोचू शकतील आणि अधिक यात्रेकरुही या सेवेद्वारे दर्शन घेऊ शकतील. या सेवेचे भाडे अद्याप ठरले नसले तरी त्यासाठी मोठा खर्च होणार आहे हे मात्र नक्की.
रस्त्याने प्रवास करण्यासाठी जम्मूमध्ये बेस कॅम्प बनवला आहे. यानंतर विशेष ताफ्यातील प्रवास श्रीनगर आणि पहलगामकडे रवाना होईल. श्रीनगरमध्ये यात्री निवासातील सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत. रस्त्याने बालटाल (नीलग्रथ) श्रीनगरपासून ९३ किमी आणि पहलगाम ९१ किमी अंतरावर आहे. तेथून हेली सेवा घेणाऱ्या प्रवाशांना पंजतर्णीला जावे लागते व त्यानंतर ये-जा करण्यासाठी सहा किलोमीटर पायपीट करावी लागते. बहुतेक प्रवासी पायी प्रवास करतात. प्रवाशांना पहलगाम मार्गावर पायी जाण्यासाठी किमान तीन दिवस लागतात, तर बालटाल मार्गाला एक दिवस लागतो. राज्य सरकारने भाविकांसाठी सेवांचा विस्तार केला आहे. दोन्ही यात्रा मार्गावर लंगरही लावण्यात येत आहेत. जम्मूमधील माझिन, रामबनमधील चंद्रकोट आणि श्रीनगर येथे यात्री निवास बांधण्याचे काम सुरू आहे. रामबनच्या यात्री निवासाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.