अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमरावती पदवीधर निवडणुकीचा निकाल अखेर तब्बल ३० तासांनी लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. तर, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजित पाटील हे पराभूत झाले आहेत. पाटील हे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मानले जातात. त्यांचा पराभव हा भाजपला जोरदार चपराक असल्याचे बोलले जात आहे.
अमरावती, दि. 3 : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वाधिक 46 हजार 344 मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे विजयी उमेदवार ठरले. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत श्री. लिंगाडे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मजा, मुलगा सोहम आणि वेदांत उपस्थित होते.
निवडणूकीत झालेल्या 1 लाख 2 हजार 587 मतदानापैकी 93 हजार 852 एवढी मते वैध व 8 हजार 735 मते अवैध ठरली. अवैध ठरलेल्या 8 हजार 735 मतांचे फेरअवलोकन करण्याची मागणी उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार या मतांची फेरमोजणी करण्यात आली. यापैकी 348 मते वैध मानण्यात आली. त्यानुसार एकूण वैध मते 94 हजार 200 ही संख्या निश्चित होऊन 8 हजार 387 मते अवैध ठरली. विजयासाठी 47 हजार 101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.
मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेत श्री. लिंगाडे यांना सर्वाधिक 43 हजार 517 मते मिळाली. डॉ. पाटील यांना 41 हजार 171 मते मिळाली. अनिल ओंकार अमलकार (4 हजार 188), डॉ. गौरव आर. गवई (241), अनिल वकटूजी ठवरे (26), अनंतराव राघवजी चौधरी (79), अरुण रामराव सरनाईक (1 हजार 542), ॲड. आनंद रवींद्र राठोड (383), धनराज किसनराव शेंडे (23), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (69), निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), पाटील उपेंद्र बाबाराव (66), पाटील झांबरे शरद प्रभाकर (421), प्रजापती श्याम जनमोहन (208), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1 हजार 695), प्रवीण दिगांबर बोंद्रे (45), भारती दाभाडे (216), माधुरी अरुणराव डाहारे (93), रणवीर संदेश गौतमराव (43), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), विकेश गोकुलराव गवाले (51), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), संदीप बाबुलाल मेश्राम (70) प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेनंतरही कोटा पूर्ण होत नसल्याने बाद फेरी सुरू होऊन त्या फे-यांत सर्वात कमी मते मिळाल्याने बाद होणा-या उमेदवारांची दुस-या पसंतीक्रमाच्या मतांची गणना झाली.
या गणनेदरम्यान निलेश दिपकपंत पवार (राजे), लक्ष्मीकांत नारायण तडसे, धनराज किसनराव शेंडे, सुहास विठ्ठलराव ठाकरे, अनिल वकटुजी ठवरे, रणवीर संदेश गौतमराव, प्रविण डिगांबर बोंद्रे, विकेश गोकुलराव गवाले, पाटील उपेंद्र बाबाराव, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, संदीप बाबुलाल मेश्राम, अनंतराव राघवजी चौधरी, माधुरी अरुणराव डाहारे, प्रजापती श्याम जगमोहन, डॉ. गौरव आर गवई, श्रीमती भारती ख. दाभाडे, ॲड. आनंद रविंद्र राठोड, शरद प्रभाकर झांबरे पाटील, अरूण सरनाईक, डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी, अनिल ओंकार अमलकार हे उमेदवार त्यांच्या कमी मतसंख्येनुसार क्रमाक्रमाने बाद ठरविण्यात आले.
त्यानंतर उर्वरित दोन उमेदवारामध्ये प्रथम क्रमांकाची सर्वाधिक 46 हजार 344 मते श्री. लिंगाडे यांना व दुस-या क्रमांकाची 42 हजार 962 मते डॉ. पाटील यांना मिळाली. त्यानुसार श्री. लिंगाडे यांना 3 हजार 382 ही अधिकची मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक मतमोजणीला बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे काल दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू झाली. तब्बल 34 तास ही प्रक्रिया चालली. निवडणुकीत 265 टपाली मतपत्रिकांपैकी प्रतिज्ञापत्र नसणे, सही, साक्षांकन, सीलबंद पाकिटात नसणे आदींमुळे 73 मतपत्रिका रद्द करण्यात आल्या.
विधान परिषद निवडणूकीत विजय मिळवल्याबद्दल श्री.सुधाकर आडबाले (नागपूर शिक्षक मतदारसंघ), श्री. विक्रम काळे (औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ) आणि श्री.धीरज लिंगाडे
(अमरावती पदवीधर मतदारसंघ) यांचे मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/ds8AmjG4GD— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 3, 2023
अन्य उमेदवारांची मते खालीलप्रमाणे –
निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), धनराज किसनराव शेंडे (23), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), अनिल वकटूजी ठवरे (26), रणवीर संदेश गौतमराव (44), प्रवीण दिगांबर बोंद्रे (46), विकेश गोकुलराव गवाले (52), पाटील उपेंद्र बाबाराव (70), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (73), संदीप बाबुलाल मेश्राम (76), अनंतराव राघवजी चौधरी (80), माधुरी अरुणराव डाहारे (108), प्रजापती श्याम जनमोहन (212), डॉ. गौरव आर. गवई (246), भारती ख दाभाडे (252), ॲड. आनंद रवींद्र राठोड (402), पाटील झांबरे शरद प्रभाकर (462), अरुण रामराव सरनाईक (1596), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1774), अनिल ओंकार अमलकार (4338).
मतमोजणीचे कार्य करत असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडल अधिकारी एस. सी. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवंगत खडसे यांना निवडणूक प्रशासन व अधिकारी- कर्मचा-यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
विधान परिषदेच्या राज्यातील एकूण ५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात काँग्रेसच्या २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. तर, भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे विजयी झाले. तर, आता अमरावतीमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी विजय प्राप्त केला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. तर, नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे निवडून आले आहेत.
Amaravati Graduate Election Result Declared after 30 Hours
Congress Dhiraj Lingade Win BJP Defeat MLC