अमळनेर – शहरात एक तरुणी एका तरुणाबरोबर पळून गेल्यावरून काही समाज कंटकांनी किरकोळ दगडफेक केल्याने बाजारात दुकाने पटापट बंद झाली होती. तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक घेण्यात आली. उपद्रव आणि चिथावणी खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा आमदार अनिल पाटील यांनी देत उपस्थितांना शांततेचे आवाहन केले. शहरातील एका व्यापाऱ्याची मुलगी एका तरुणाबरोबर पळून गेल्याच्या वृत्ताने खळबळ माजली. त्याचवेळी इस्टाग्रामवर हा प्रकार लव जिहाद असून अजून काही मुली पळून जाणार असल्याचे समजताच काही तरुणांनी पोलीस स्टेशनला गर्दी केली होती.
दुसऱ्या दिवशी दुपारी पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून शांतता समितीची बैठक आयोजित केली तत्पूर्वी गावात काही तरुणांनी सुभाष चौकात एका फुल भांडारवर दगडफेक केली. मंगलमूर्ती चौक, पोस्ट चौक तसेच दोन तीन ठिकाणी हातगाड्या उलथवण्यात आल्या. घटनेचे वृत्त कळताच व्यापाऱ्यांनी दुकाने पटापट बंद केली. थोडी पळापळ झाली मात्र त्याचवेळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डी वाय एस पी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक शत्रूघन पाटील, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांच्यासह पोलिसांनी शांततेचे आवाहन करून व्यापाऱ्यांना दुकाने पुन्हा उघडण्याची विनंती केली. वातावरण निवळल्यानंतर पोलीस स्टेशनला शांतता समिती बैठक घेण्यात आली.
दोघा युवा-युवतीमुळे गावात दंगल झाली म्हणून त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली. तसेच, पोलिसांना तपास करू द्या असे आवाहन केले. तर अय्याज खान नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रकार केला. त्याने पाकिस्तानचा झेंडा देखील लावल्याचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाला खतपाणी घालणाऱ्यांचा शोध घ्यावा असे आवाहन केले. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सोशल मीडियावर चिथावणी देणाऱ्यावर आणि शहरात अशांतता माजवणाऱ्या वर गुन्हा दाखल केला जाईल, व्यवसायिकांना त्रास देऊ नका, कोणालाही माफ केले जाणार नाही, असे बजावले.
तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. तर डीवायएसपी राकेश जाधव यांनी देखील शांततेचे आवाहन केले. तर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी देखील या प्रकारांबद्दल सतर्कता ठेवण्याचे आवाहन केले. ज्यांच्यामुळे शहरातील वातावरण बिघडत आहे, त्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला. बैठकीस हिंदू, मुस्लिम धर्माचे, सर्व पक्षाचे प्रतिष्ठीत मान्यवर हजर होते.