मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रशिया-युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलासह अनेक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. चांगली मागणी आणि कमी पुरवठा होण्याच्या भीतीने जागतिक साठ्यात घट होत असल्याने अॅल्युमिनिअमच्या किमती वाढण्याचा अंदाज इक्रा या रेटिंग एजन्सीने वर्तवला आहे. अॅल्युमिनिअमच्या जागतिक व्यापारात रशियाची १२ टक्के भागीदारी आहे. युक्रेनवर युद्ध लादल्यामुळे रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. रशियातून अॅल्युमिनिअमच्या जागतिक बाजारातील निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले, तर पुवरठ्याचे संकट गडद होणार आहे.
कमी पुरवठ्यामुळे संपूर्ण जगात अॅल्युमिनिअमची उपलब्धता प्रभावित झाली आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत किमतीही उच्च पातळीवरच राहणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अॅल्युमिनिअमच्या किमती आतापर्यंतच्या उच्च पातळीवर म्हणजे ३,८७५ डॉलर प्रतिटनवर पोहोचल्या आहेत. सध्या अॅल्युमिनिअमच्या किमती ३,३२० डॉलर प्रतिटन आहेत. जागतिक पातळीवर अॅल्युमिनिअमचा पुरवठा कमी झाल्याचे हे द्योतक मानले जात आहे.
युरोपीय देशांमध्ये अॅल्युमिनिअमच्या किमतीत वाढ झाल्यानेसुद्धा जागतिक पातळीवर त्याच्या किमती वाढल्या आहेत. युरोपीय बाजारात सध्या अॅल्युमिनिअमच्या किमती सप्टेंबर २०२१ पेक्षा तीन पटीने अधिक झाल्या आहेत. इक्रचा वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समुह प्रमुख जयंत रॉय म्हणाले, की देशांतर्गत अॅल्युमिनिअम उत्पादनांची आवश्यकता कोळशावर आधारित कॅप्टिव्ह वीज संयंत्राद्वारे पूर्ण केली जाते. देशातील दोन तृतीयांशहून अधिक कोळशाच्या गरजा कोल इंडिया कंपनीच्या कॅप्टिव्ह खाणीतून भगवल्या जातात. २०२३ या आर्थिक वर्षात अॅल्युमिनिअमच्या अनुकूल किमती देशांतर्गत उत्पदनांचा नफा वाढवणार आहेत. देशांतर्गत अनुकूल मागणीशिवाय निर्यातीचा पर्याय खुला आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनांचा फायदा होईल. रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या किमतीही वाढल्या आहेत. परिणामी वाढत्या विजेच्या बिलामुळे सामान्य माणसाच्या खिशाला झळ बसणार आहे. युद्धाच्या संकटामुळे कोळशाच्या किमती वाढल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. देशातील अनेक महत्त्वाची वीजनिर्मिती संयंत्रे आयात केलेल्या कोळशावर अवलंबून आहेत. त्यामुळे विजेचे दर वाढण्याची शक्यता आहे.