मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फळांचा राजा असलेला हापूस आंब्याची या वर्षीची पहिली निर्यात झाली आहे. पहिल्यांदाच आंबा जपानला पाठविण्यात आला आहे. निर्यातीला चालना देत, कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) हंगामातील हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप जपानला निर्यात केली. अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा.लि. यांनी जपनाच्या लॉसन रिटेल चेनकडे हापूस आणि केशर आंबा निर्यात केला. निर्यात केलेले आंबे अपेडा मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने (MSAMB) प्रक्रिया करून पॅकिंग केले आहेत. टोकियो, जपान येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय दूतावास आणि इन्वेस्ट इंडिया यांनी आज, (28 मार्च) आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. अपेडाने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यापार मेळे (ट्रेड फेअर्स), शेतकऱ्यांसाठी पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदी-विक्री मेळावा, उत्पादन केंद्री मेळावे अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.