नाशिक : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भिवंडीतील नारपोली वाहतूक विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यामुळे दुखावलेल्या ठाण्याचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग यांनी माझी तात्काळ बदली केली असा आरोप नाशिक ग्रामिणचे पोलीस उपअधिक्षक श्याम निपुंगे यांनी केला आहे.
त्यानंतर पोलीस कर्मचारी सुभद्रा पवार मृत्यु प्रकरणात मला गोवले गेले आहे, असा आरोप निपुंगे यांनी केला आहे. २०१७ मध्ये महिला पोलीस कर्मचारी सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद नोंदविण्यात आली होती. मात्र ती आत्महत्या नसूनपवार यांचा खून झाला होता असा निपुंगे यांचा दावा आहे. एका सहकारी पोलीस कर्मचा-याशी पवार यांचे प्रेमसंबध होते. त्यातून हा खून झाल्याचा दावा निपुंगे यांनी केला आहे. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला आहे.