धमतरी (छत्तीसगड) – चोरीचा आरोप लावल्याने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी कथितरित्या विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भखारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगदेही गावातील रहिवासी दिलीप यादव (४८), दिलीप यांची पत्नी कलिंद्रीबाई (४५), मुलगी उर्वशी यादव (२३), तामेश्वरी (२१), मुलगा सुनील (१८) आणि राजेश यादव (१६) यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
कुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्रीच्या सुमारास एकत्र विष प्यायले. शेजार्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सर्वांना १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, असे पोलिसांनी सांगितले. दिलीप यादव यांचा मुलगा सुनील यादव म्हणाला, या महिन्याच्या १८ तारखेला पोलिसांनी त्याच्या वडिलांना चोरीच्या आरोपाखाली पोलिस ठाण्यात घेऊन गेले होते. दिलीप यांना सायंकाळी सोडून देण्यात आले. चोरीच्याच प्रकरणी १९ जुलैला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. ग्रामपंचायत सदस्यांनी दिलीप यांना चोरी झालेले पैंजण आणि पाचशे रुपये परत देण्यास सांगितले. गावात बदनामी झाल्याने कुटुंबातील सर्वांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
भखारा पोलिस निरीक्षक संतोष जैन म्हणाले, जुगदेही गावात नेमचंद साहू यांच्या घरी चोरी झाली होती. या प्रकरणी १९ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलीप यादव आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले नव्हते. नेमचंद साहू यांनी दिलीप यादव यांनी चोरी केल्याची शक्यता वर्तविली होती. पोलिस त्यांच्या गावी गेले होते परंतु त्यांची चौकशी केली नाही. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असून, तपास सुरू आहे.