देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या रिलायन्स, जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल यांनी ग्राहकांना चांगलाच धक्का दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या स्वस्त प्लॅनच्या यादीतून एसएमएस बेनिफिट्स हटविले आहे. याकडे खूपच कमी ग्राहकांचे लक्ष वेधले गेले आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, फायद्यात राहण्यासाठी कंपन्यांनी काही स्वस्त प्लॅन आणले आहेत. त्यातून फ्री एसएमएस सुविधा हटविण्यात आली आहे. उपरोक्त कंपन्यांनी कोणकोणत्या प्लॅनमधून फ्री एसएमएस सुविधा हटविली आहे, हे आपण जाणून घेऊयात.
जिओचा ९८ रुपयांचा प्लॅन
सर्वात प्रथम रिलायन्सच्या जिओबाबत जाणून घेऊयात. तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर तुम्हाला लक्षात येईल. जिओने नुकताच ९८ रुपयांचा प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. प्लॅनसोबत युजर्सना अमार्यादित व्हॉइस कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. १४ दिवसांसाठी रोज १.५ GB डाटा मिळत आहे. परंतु या प्लॅनमध्ये फ्री एसएमएस बेनिफिटचा समावेश नाही.
व्होडाफोन आयडिचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाने नुकतेच ९९ रुपये आणि १०९ रुपयांचे दोन नवे प्लॅन सादर केले आहेत. Vi ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना १८ दिवसांमध्ये फ्री कॉलिंग आणि १ GB डाटा मिळणार आहे. तसेच १०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ GB डाटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग २० दिवसांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २० दिवसांची असेल. परंतु या दोन्ही प्लॅन्समध्ये फ्री एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही.
एअरटेलचा प्लॅन
भारती एअरटेलने १०० रुपयांहून कमी असलेला प्रीपेड प्लॅन ऑफर केलेला आहे. हा प्लॅन १९ रुपयांचा असून, यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि २ दिवसांसाठी २००MB डाटा उपलब्ध होणार आहे. यामध्येसुद्धा फ्री एसएमएस बेनिफिट उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.