मुंबई/नाशिक – राज्यात येत्या दोन-तीन दिवसात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने, तत्पूर्वी विविध पूर्तता करण्यासाठी राज्यातील व्यापारी सोमवारी आपले व्यापार दहा ते पाच या वेळेत सुरू करणार आहेत. तशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे.
राज्य सरकारचा निर्णय रविवारी सायंकाळपर्यंत येईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे राज्यभरातील व्यापारी या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. परंतु सरकारने आज कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. वर्षअखेर नंतरच्या सरकारी कामकाजाची पूर्तता,तसेच अन्य बाबींची तयारी लॉक डाऊनपूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील व्यापारी दहा ते पाच या मर्यादित वेळेत कोरोना संक्रमण रोखण्यासाठीच्या सर्व निकषांचे कडकपणे पालन करून आपले व्यापार सुरू करणार असल्याने, सर्व जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यभरातील व्यापाऱ्यांनी कोरोना संबंधीच्या निकषांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे. मास्क शिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये. सोशल डिस्टंसिंग, सनिटेईजेशन या बाबींचे कसोशीने पालन करावे. दुकानदार स्वतः व आपल्या कामगारांच्या तपासण्या करून, लसीकरण सुद्धा लवकरात लवकर करून घ्यावे.असेही आवाहन चेंबर तर्फे राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना करण्यात येत आहे.