इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– बाईकवरील भारत भ्रमंतीचा थरार –
…आणि तरुण दादांची प्राणज्योत मालवली
जम्मी काश्मीरमध्ये आमचा प्रवास सुरू होता. जम्मूहून पुणे आम्ही लेहपर्यंत जात होतो. लेहला आम्ही सुखरुप पोहचलो पण काळाने आमच्यातील एका सहकाऱ्याला गाठले. ती काळीकुट्ट रात्री आयुष्यात कधीही विसरता येणार नाही.. या घटनेमुळे मी परत नाशिकला यायला निघाले होते पण….
कारगीलपासून लेहपर्यंत सुरुवात करताना सर्वांनाच आम्हाला प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सांगण्यात आले होते. आणि वारंवार पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला होता. हाय माउंटन सिकनेस असणाऱ्यांसाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. लेहला पोहोचताना वाटेत नमिकाला 12,200 फूट आणि फोटोला 13,480 फूट असे दोन पासेस क्रॉस झाले. त्यानंतर लंचसाठी लामायुरूला थांबायचं होतं. परंतु आज आमचे लीडर संदीप यांचे लक्ष कुठेतरी भलतीकडेच होते. त्यामुळे त्यांच्याकडून लंच पॉईंट स्किप झाला. आणि आम्ही त्यांना फॉलो करत होतो. त्यामुळे आमच्याही ते लक्षात आले नाही. जवळजवळ 50 किलोमीटर पुढे आम्ही निघून गेलो. आता दुपारचे तीन वगैरे वाजले असतील. भुकेने सर्वच हैराण झाले होते. वाटेत कुठेही हॉटेल नव्हते. त्यामुळे सगळे चिडले होते संदीपवर.
परंतु मागे जाण्याचा पर्यायही नव्हता. कारण रस्ता प्रचंड छोटा आणि अवघड होता. अशा ठिकाणी 50 किलोमीटर मागे पुन्हा जायचे हे इतके सोपे नव्हते. कसं बस पुढे एक छोटसं हॉटेल वजा टपरी सापडली. तिथे पहाडो वाली मॅगी खाऊन समाधान मानावे लागले. त्यावेळी संदीपची अवस्था दयनीय झाली होती. असो, पुढे प्रवास चालू झाला आणि लेहच्या पत्थर साहेब गुरुद्वारा मध्ये आम्ही पोहोचलो. पत्थर साहेबच्या पाच किलोमीटर अलिकडे मॅग्नेटिक हिल नावाचा एक छोटासा पठार आहे. रस्त्या लागत असलेले हे मॅग्नेटिक हिल आपल्या गाड्यांना स्वतःकडे ओढून घेते की काय अशा पद्धतीचा तिथे भास होतो. कुठलीही लोखंडाची वस्तू स्वतःकडे आकर्षित करण्याचं त्या छोट्याशा पठाराला वरदान असल्याने त्याला मॅग्नेटिक हिल असं नाव देण्यात आले आहे.
पठार साहेब गुरुद्वारा दर्शन घेतल्यानंतर लेहच्या TC 257 आर्मी कॅम्प मध्ये आज राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. सर्वच खूप थकलो होतो. कारण प्रचंड थंडी होती. तिथे पोहोचल्यानंतर काही जणांना तिथली राहण्याची आणि जेवणाची सुविधा अमान्य केली. त्यामुळे त्यांनी आपापली सोय लेह मार्केटच्या काही हॉटेल्स मध्ये केली. सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि झोपायला गेले. अचानक मध्यरात्री आमच्या सोबत असलेले कलकत्त्याचे तरुण दादा यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांना श्वासोश्वास घेण्यात खूप त्रास होत होता. व्हेंटिलेटर लावून आणि कृत्रिम ऑक्सिजन देऊन त्यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. परंतु पहाटे चारच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि पहाटे चार वाजता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
माझाही फोन वाजला. मध्यरात्री आलेला तो फोन उचलताना प्रचंड अस्वस्थ वाटत होते. परंतु जशी ही बातमी कळाली *Tarun dada is no more. पाया खालची जमीन सरकली… संध्याकाळी पार्किंग मध्ये गाड्या लावताना त्यांचा निरोप घेऊन त्यांना गुड नाईट विश करून मी माझ्या खोलीत आले होते. वाटलं नव्हतं की त्यांची आणि माझी शेवटची भेट ठरेल. तो दिवस आम्ही कोणी कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येक जण इमोशनली खूप खचून गेला होता. मी तर घरी फोन करून परत येऊ का? असं विचारलं. परंतु माझ्या घरच्यांनी असं करू नकोस, तुझा स्वप्न तू पूर्ण कर, असे मला सुचवले. तरीही मनात खुपच कालवाकालव होत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच आम्ही सर्वे आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये तरुण दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमा झालो. दिवसभर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि त्यांचे पार्थिव कलकत्त्याला विमानाने पाठवण्यात आले. त्यावेळी आम्ही सर्व रायडर्सने मिळून एक निर्णय घेतला की तरुण दादांचं स्वप्न असलेली ही ऑल इंडिया फ्रीडम मोटो राईड त्यांचे हेल्मेट सोबत घेऊन पूर्ण करायचे. आमच्या सोबत असलेला सिक्कीमचा विवेक हा संपूर्ण 75 दिवस त्यांच हेल्मेट स्वतःच्या बाईकला बांधून फिरला. बायकर्स ने बायकरला वाहिलेली हिच खरी श्रद्धांजली ठरली.
All Inia Bullet Ride Series Leh Biker Death by Deepika Dusane