पुणे – पुणे येथे बालेवाडी स्टेडियममध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या रेल्वेच्या ५५ व्या ऑल इंडिया चॅम्पियनशीप स्पर्धेत मध्य रेल्वे तर्फे मुंबईची आंतरराष्ट्रीय नेमबाज कु. रुचिरा अरुण लावंड हिला ५० मीटर प्रोन या क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण पदकं मिळाली आहेत. कु. रुचिरा ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येते मुख्य कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत असून तिला महाराष्ट्र शासने शिव छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
भारतीय रेल्वेच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे असे एकूण १४ संघ सहभागी होते. यावेळी सलग सातव्यांदा मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी बाजी मारत सर्वात जास्त पदके मिळवून या स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. मध्य रेल्वेने ३५ गुण मिळवून आपलं नाव चॅम्पियनशीप ट्रॉफीवर कोरलं. तर पश्चिम रेल्वेने १९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी विशेष कौतुक केले आहे.