कोलकाता – बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आणि समर्थकांवर हल्ले होत असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारला मिळत आहेत. सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून हे हल्ले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राज्यातील सर्व नव्या आमदारांना संरक्षण पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणुकीनंतर होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाचे पथक बंगालमध्ये विविध ठिकाणांचा दौरा करून आढावा घेत आहे. नंदिग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभव करणार्या सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बंगालमधील सर्व आमदारांसाठी संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यानसुद्धा भाजपच्या उमेदवारांवर हल्ले झाले होते. त्यानंतर जवळपास सर्वच उमेदवारांना संरक्षण पुरविण्यात आले होते. भाजपच्या सर्व खासदारांनाही केंद्रीय संरक्षण मिळालेले आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या विधानसभेच्या परिसरात केंद्रीय संरक्षण दलांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्यात आले होते.