मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगाव बॅाम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे एनआयएच्या विशेष न्यायालयाने म्हटले आहे. १००० हून अधिक पानांचा निकाल असल्याचे न्यायालयाने हा निकाल देतांना सांगितले.
मालेगावमध्ये भिक्खू चौकात २९ सप्टेंबर २००८ मध्ये भीषण बॅाम्बस्फोट झाला होता. त्यात ६ जणांचे प्राण गेले तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या बॅाम्बस्फोटाच्या घटनेनंतर तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयाने दिला.
बेनिफिट ऑफ डाऊट असल्यामुळे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले.
या प्रकरणात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने केली होती.