नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्वीच्या काळात (आणि आताही काही प्रमाणात) रायरंद म्हणजेच बहुरूपी केलेल्या व्यक्ती गावोगावी पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांची वेशभूषा करून लोकांकडून पैसे मागत असे. परंतु आपण बहुरुपी आहोत, हे देखील तो स्पष्टपणे खरे सांगत असे. तरीही लोक त्याच्या कलेवर खूष होऊन पैसे देत असत. परंतु सध्याच्या काळात बहुरूपी किंवा तोतया यांचा समाजात सुळसुळाट झालेला दिसून येतो.
कोणीतरी भामटा आपण अधिकारी आहोत, राजकीय नेते आहोत, असे सांगून सर्वसामान्य नागरिकांपासून ते वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीकडून देखील तो पैसे लुबाडतो, अशाच प्रकारे एका भामट्याने आपण चक्क उपराष्ट्रपती असल्याचे सांगण्यापर्यंत मजल गेली. या भामट्याने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलतोय असे सांगून काही लोकांना फोन कॉल केले तसेच समाज माध्यमातून मेसेज पाठवले आणि फक्त पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला होता. ही बाब निदर्शनास येताच संबंधित खात्याने या संदर्भात सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आहे अशी भूमिका मांडणारा एक व्यक्ती VIP व्यक्तींसह नागरिकांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवत आहे, मदत आणि आर्थिक मदत मागतो आहे. त्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली.
या संदर्भात अधिकृत निवेदनात, उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने नागरिकांना सावध केले की ही व्यक्ती मोबाईल नंबर 9439073183 वरून व्हॉट्सअॅप संदेश पाठवत आहे. त्यात म्हटले आहे की, “असे बनावट संदेश अधिक क्रमांकांवरून येत असण्याची भीती आहे.” तसेच असे व्हॉट्सअॅप मेसेज अनेक व्हीआयपींना पाठवण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. “उपराष्ट्रपतींच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर, उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.