पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या उन्हाचा तडाका चांगला जाणवू लागल्याने सहाजिकच नागरिक थंड पेयाकडे वळत आहेत. यात प्रामुख्याने उसाचा रस, लस्सी, सरबत आदींचा समावेश आहे. तसेच कोल्ड्रिंक्स देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, परंतु एनर्जी ड्रिंक तथा कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली आणली तथा नशा येणारे थंडपेय सध्या बाजारात आले असून तरुण-तरुणी या मादक पेयाच्या आहारी जात आहेत.
विशेष म्हणजे लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील यापासून धोका आहे. एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंड पेये बाजारात आली असून किराणा दुकान, छोटी हॉटेल किंवा पानटपरीवर सहज दहा वीस रुपयांत ही पेये मिळत आहेत. यातून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला, पुरुषही या ड्रिंक्सच्या आहारी गेले आहेत.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कॅफेन हे शंभर मिली ग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेल्यास जास्त नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होतो. गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांनी हे घेऊ नये. बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येते. थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले तरी त्याचे व्यसनच लागते.
कोठेही अगदी सहज व कमी पैशात हे पेय मिळत असल्याने उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा सहारा घेत आहेत. विशेष म्हणजे हे ड्रिंक घेतल्यावर तोंडाचा वास येत नाहीत चार तास झींगा राहते तसेच झोप येत नाही व स्फूर्ती वाढते त्यामुळे अनेक वाहन चालकही मोठ्या प्रमाणात याचे सेवन करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे २५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशी नोंदही या बाटलीवर आहे. शिवाय लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना धोकादायक असल्याची स्पष्ट नोंद त्यावर आहे. या बाटल्यांत प्रत्येक १०० मि.ली.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे. मात्र, या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत. दिवसभरात पाचशे मिलीपेक्षा जास्त घेऊ, नये असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले असले तरीही ही पेये सहज उपलब्ध होत आहेत. परंतु अन्न आणि औषध प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतेही कारवाई केली दिसून येत नाही.
Alert Summer Hot Energy Drinks