ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ खाऊ घालण्यावर ठाणे महापालिकेने बंदी आणली आहे. कबुतरांची पिसे, विष्टा यातून ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा धोका असल्याचे कारण देत महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आरोग्यप्रेमींनी स्वागत केलेले असताना पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
चौकात, रस्त्यावर, मोकळ्या जागेवर असणाऱ्या कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज आवर्जून पशूपक्ष्यांना खाद्यपदार्थ देणारे अनेक पशूपक्षीप्रेमी सभोवताल दिसून येतात. अशांसाठी ठाणे महापालिकेचा निर्णय संतापजनक ठरत आहे. या निर्णयावरून ठाणे महापालिकेवर बरीच टीकादेखील होत आहे. या निर्णयामागील कारण सांगताना महापालिकेने स्पष्ट केले आहे की, कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार बळवण्याचे प्रमाण पुण्यासह मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फुप्फुसांशी संबंधित आजार झालेल्यांमध्ये ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’ हा आजार होण्याचे सर्वाधिक प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. याच पार्श्वभूमीवर कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यास मनाई केली आहे.
डॉक्टरही म्हणतात धोकादायक
कबुतरांनी केलेली विष्ठा सुकल्यानंतर त्यातून धुळीकणासारखे कण हवेत पसरतात. त्याचबरोबर कबुतरांच्या पिसांमधूनही असेच कण बाहेर पडतात. हे कण नागरिकांच्या फुप्फुसामध्ये जातात आणि त्यामुळे श्वसननलिकेला सूज येऊन तिचा आकार आतून कमी होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. धुलीकण हे वजनाने हलके असल्यामुळे फुप्फुसाच्या आत शेवटपर्यंत जात नाहीत. परंतु, विष्ठा आणि पिसांमधून निघणारे कण हे वजनाने जड असल्याने ते फुप्फुसाच्या आत शेवटपर्यंत जातात. त्यातूनच ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार बळवतो. या आजारावर ठोस औषधेही उपलब्ध नाहीत, असे ठाणे महापालिकेचे फुप्फुस रोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.
Alert Pigeon’s Bird Human Health Effect Disease Infection