मुंबई – ऑनलाइन घोटाळे आणि हॅकिंगच्या अनेक घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. कोरोना महामारीमुळे सायबर घोटाळे वाढले असल्याचा दावा सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी केला आहे. महामारीमुळे जगभरातील नागरिकांना इंटरनेटवर जास्तीत जास्त काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दिवसभराच्या कामासाठी नागरिक पूर्वीपेक्षा अनेक पटींनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहू लागले आहेत. हॅकर्स आणि घोटाळे करणारे गुन्हेगार ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत असून, वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक करत आहेत.
नुकत्याच समजलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार युजर्सचा डाटा आणि पैसे चोरण्यासाठी PhoneSpy स्पायवेअरचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. Zimperium या मोबाइल सुरक्षा कंपनीच्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार PhoneSpy नावाची एक स्पायवेअर मोहीम चालवत आहेत. त्यामध्ये हेल्पफुल टूल म्हणून ते स्पायवेअर अॅप्सच्या ग्रुपमध्ये असतात. उदाहरणार्थ, PhoneSpy स्पायवेअर चित्रपटाचे स्ट्रीमिंग, योगा शिकण्यात मदत करण्याच्या अॅपद्वारे अँड्रॉइडमध्ये शिरलेले असतात. वास्तवात असे अॅप्स धोकादायक असतात. जर तुम्ही असे अॅप्स वापरत असाल, तर त्वरित फोनमधून डिलिट करा.
PhoneSpy म्हणजे काय?
PhoneSpy स्पायवेअर मुख्य रूपात सब्सक्रायबरकडून माहिती, फोटो, व्हिडिओ चोरण्याची योजना तयार करत असतात. स्पायवेअर हे विशेषतः अँड्रॉइड युजर्सना टार्गेट करतात. त्यांनी आतापर्यंत कोणत्याही आयओएस युजर्सना प्रभावित केलेले नाही. त्यामुळेच अँड्रॉइडचा वापर करणार्यांनी त्वरित असे धोकादायक अॅप्स हटवावेत. PhoneSpy स्पायवेअर लॉगिन क्रेडेंशिअल, एसएमएस, कॉल लॉग, फोन कॉन्टॅक्ट्स आणि इमेजेस, अशा प्रकारची माहिती चोरू शकते. त्याशिवाय असे स्पायवेअर जीपीएस लोकेशनवर देखरेख ठेवतात. रिअल टाइममध्ये ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. डिव्हाइसची माहितीही चोरू शकतात.
असे स्पायवेअर अॅप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. Zimperium च्या माहितीनुसार PhoneSpy मोहीम फक्त २३ अँड्रॉइड अॅप्समध्ये सुरू आहे. ओळख पटलेले PhoneSpy अॅप्स दक्षिण कोरियाच्या नागरिकांना टार्गेट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दक्षिण कोरियाच्या बाहेरील नागरिक सध्या सुरक्षित आहेत. दक्षिण कोरियाच्या हजारो नागरिकांनी PhoneSpy स्पायवेअर अॅप्स डाउनलोड केले आहेत.