नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या माध्यमातून भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी विविध योजना आखल्या जात असल्याचे समोर आले आहे. भारतीय सैनिकांना हनी ट्रॅपध्ये अडकवण्यासाठी महिला ब्रिगेड तयार करून त्यांच्याद्वारे कटकारस्थाने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या या संघटनेत ५० मुलींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय गुप्तचर संघटनेकडून याबाबत अलर्टदेखील जारी करण्यात आले आहे.
सैन्य दलातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रशिक्षण हैदराबाद, सिंध येथून पाकिस्तानी लष्कराच्या इंटेलिजन्स युनिट ४१२द्वारे केले जात आहे. या मॉड्यूलचे लक्ष्य राजस्थान आणि गुजरात सीमेवरील लष्करी तळांवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या सैनिकांवर आहे. पाकिस्तानच्या या महिला एजंट पाकिस्तानी लष्करात ब्रिगेडियर आणि कॅप्टन या पदावर काम करत आहेत. पाकिस्तानकडून हा कुटील डाव रचला जात असल्याने भारतीय गुप्तचर संस्थेकडून लष्कर आणि बीएसएफच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून हा धोका असल्याने सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका अशी सुचनाही भारतीय गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने भारतीय लष्कराच्या जवानांना अडकवण्यासाठी हनीट्रॅपचे १० मॉड्यूल तयार केले आहेत. त्यामध्ये ५०पेक्षा जास्त मुली आहेत. लष्करात ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते त्याच पद्धतीने पाकिस्तान या मुलींना हनीट्रॅपचे प्रशिक्षण देत आहे. महिला ब्रिगेडला नियुक्त केल्यानंतर पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ट्रेनिंग दिले जात असून ट्रेनिंगनंतर हॉटेलमध्ये रूम बुक केले जाते व या मुलींना मेकअप किट दिले जातात. तसेच त्यांना रिया, खुशी, कल्पना, नीतू, मुस्कान, गीतू, अवनी आणि हरलीन अशी भारतीय नावेही देण्यात येत आहेत.
असे केले जाते हनीट्रॅप..
सोशल मीडियावर फेक आयडी बनवून पाकिस्तानी हनीट्रॅप आर्मीच्या एजंट असलेल्या मुली आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर प्रेमाने बोलायला सुरुवात करुन प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. त्यानंतर ते सैनिकाला लग्नाचे वचन देतात. नंतर या मुली टार्गेट पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार होतात. या सगळ्यानंतर देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त कागदपत्रांची मागणी केली जाते.
गुप्तचर संस्थेच्या मतानुसार जी व्यक्ती हनीट्रॅपमध्ये अडकलेली असते तिला वाटते आपल्या दोघांमधीलच हा संवाद आहे, मात्र या गोष्टीची नोंद पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून घेतली जात असते. मग या सैनिकांना ब्लॅकमेल केले जाते. म्हणजेच जे मागितले ते देण्यास नकार दिल्यास चॅट आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमक सुरू होते. त्यामुळे भारतीय गुप्तचर विभागाकडून सैन्य दलातील अधिकाऱ्यांना आणि जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Alert Pakistan ISI Conspiracy Indian Jawan
Honey Trap Social Media Women Brigade