मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करोनाचे संकट पूर्णत: परतलेले नसतानाच संपूर्ण देशभरात ‘एच३एन२’ या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. तसेच या विषाणूचा धोका लक्षात घेत योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘एच३एन२’ या विषाणू हवेतून पसरतो. १५ पेक्षा कमी आणि ५०हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. विषाणूचा संसर्ग श्वासनलिकेच्या वरील भागाला होतो आणि ताप येतो, असा निष्कर्ष १५ डिसेंबरपासून करण्यात आलेल्या पाहणीवरून काढण्यात आला आहे. हा आजार जीवघेणा नाही. परंतु, काही रुग्णांच्या बाबतीत श्वसनयंत्रणेला संसर्ग होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलट्या, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे आहेत. यावर उपाय म्हणून हस्तांदोलन करणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, स्वत:हून औषधे घेऊ नयेत, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रतिजैवके आणि इतर औषधे घ्यावीत, इतरांच्या अगदी जवळ बसून खाणे टाळावे. त्याचप्रमाणे हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत. मुखपट्टीचा वापर करावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत. नाक आणि तोंडाला हात लावणे टाळावे. खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकावे. पाणी पीत राहावे, भरपूर द्रवपदार्थाचे सेवन करावे. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देताहेत.
डॉक्टरांना इशारा
नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरसकट प्रतिजैवकांचा वापर करू नये आणि डॉक्टरांनी सध्या फक्त लक्षणांवर औषधे द्यावीत असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे. हा हंगामी ताप पाच ते सात दिवस येतो, असेही ‘आयएमए’ने स्पष्ट केले. हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो, असे ‘आयएमए’च्या समितीने सांगितले.
Alert New Flu Wave Cold Cough Medical Association Threat