इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – करोना, ब्लॅक फंगस, अॅडोनेव्हायरस पाठोपाठ आता मेंदू खाणाऱ्या अमिबाचे सावट घोंगावत आहे. नुकतीच या दुर्मिळ आजाराने मृत्यू झाल्याची नोंद अमेरिकेत करण्यात आली आहे.
शालेय पुस्तकांमध्ये आपण सगळेच अमिबाबत शिकलोय. पुस्तकातला अमिबा माणसाचा जीव घेणारा ठरू शकतो, याची तेव्हा कल्पना नव्हती. पण, अमेरिकेतील या घटनेने शरिरात जाणाऱ्या अमिबाची दहशत जगापुढे आणली आहे. हा प्रकार फ्लोरिडातील शार्लोट काऊंटीमध्ये घडला आहे. एका व्यक्तीचा मागच्या आठवड्यात बळी गेला. या व्यक्तीला दुर्मीळ आजार झाला होता. पुढे आजार विकोपाला गेला आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
या व्यक्तीने रोजच्या प्रमाणेच नळाच्या पाण्याने नाक साफ केले. परंतु, त्याने त्या दिवशी यासाठी पाणी न उकळताच घेतले होते. या पाण्यातूनच त्याला नेग्लेरिया फाउलेरी या अमिबाची लागण झाली. नाकावाटे शिरकाव केलेला हा जीव नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. हा जीव मेंदूत गेला की, माणसाला प्रायमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटिस-पीएएम हा आजार होतो. हा अमिबा मेंदूंच्या ऊती खाऊन नष्ट करतो. असे झाल्यास सामान्यपणे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. त्यावर डॉक्टरांना अद्याप उपाय करता आलेला नाही.
बहुतांश रुग्ण दक्षिण अमेरिकेतील
अमिबा हा एकपेशीय जीव आहे. साधारणपणे अमिबा तलाव, नदी, सरोवरात आढळतो. त्यामुळे जलतरणाचा आनंद घेणाऱ्या या अमिबापासून धोका असतो. अद्यापपावेतो नळाद्वारे हा अमिबा पाण्यात आल्याचे सिद्ध झालेले नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत घडलेला प्रकार सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. मुख्य म्हणजे हा आजार इतक्यातला नाही. अगदी १९६०पासून या प्रकारच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचे पुरावे आहेत. आजवरचा विचार करता १५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे दक्षिण अमेरिकेतील आहेत.
ही आहेत लक्षणे
– ताप
– डोकेदुखी
– उलट्या
– मान दुखणे
– स्मृतीभ्रंश
– मज्जासंस्थेशी संबंधित अडचणी
Alert New Disease Brain Eating Infection