अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्मार्टफोन आता आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाला आहे. आपल्या वैयक्तिक फोटो, व्हिडिओंपासून ते आपल्या बँक डिटेल्सपर्यंत सर्वच बाबी आपल्या स्मार्टफोनमध्ये म्हणजेच मोबाईलमध्ये असतात. पण आपल्या या वैयक्तिक माहितीची चोरी करणारा BRATA हा व्हायरस आपली चिंता वाढवणार आहे.
स्मार्टफोनने खऱ्या अर्थाने आपले जीवन स्मार्ट केले आहे. पण त्याचा वापर करताना आपल्यालाही स्मार्ट रहावे लागते. नाहीतर आपली वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता असते. BRATA या नवीन व्हायरसपासून तर अँड्रॉइड वापरकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण आपली एक चूकही आपले बँक खाते रिकामे करू शकते, इतकी ताकद या व्हायरसमध्ये आहे. BRATA हा मालवेअरचा नवीन प्रकार असून, तो अँड्रॉइड हँडसेटमध्ये असलेल्या बँकिंग अॅपची सुरक्षेला धोका पोहोचवतो. एका संशोधनानुसार, हा नवीन प्रकार डिव्हाइसचा डेटादेखील नाहीसा करतो. या व्हायरसचा शोध लागण्यामागे एक प्राप्त झालेली तक्रार कारणीभूत ठरली. BRATA मालवेअरचा एक नवीन प्रकार Android हँडसेटमध्ये उपस्थित असलेल्या बँकिंग अॅपची सुरक्षा तपासणी फसवून पैसे चोरू शकतो, असे या तक्रारीतून समोर आले. संशोधनानुसार, नवीन प्रकार डिव्हाइसचा डेटादेखील हटवते.
BRATA मालवेअर म्हणजे काय?
BRATA म्हणजे ब्राझिलियन रिमोट ऍक्सेस टूल अँड्रॉइड. या मालवेअरची ओळख २०१९मध्ये झाली. संशोधन अहवालात दावा केला गेला आहे की, BRATA मालवेअरचे नवीन प्रकार आले आहेत, जे अधिक धोकादायक आहे. वास्तविक BRATA व्हायरसने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आधारित उपकरणांना लक्ष्य केले आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन हे ओपन सोर्स आधारित आहेत. जे थर्ड पार्टी अॅप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी देतात. या थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने, BRATA व्हायरसचा एक नवीन प्रकार तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतो. यानंतर तो सायबर फसवणूक करतो. आयटी सुरक्षा संशोधक आणि इटलीस्थित फ्रॉड मॅनेजमेंट फर्म क्लीफीच्या म्हणण्यानुसार, हा मालवेअर डिव्हाइसवर स्थापित केलेल्या बँक अॅप्समधून फसवणूक करू शकतो. BRATA चे नवीन प्रकार जीपीएस आणि की लॉगिंगदेखील ट्रॅक करू शकतात. म्हणजेच, मालवेअर वापरकर्त्यांचे स्थानही ट्रॅक करू शकतो.
अशी घ्या काळजी
अँड्रॉईड वापरकर्त्यांनी थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करणे टाळावे.
गुगल प्ले स्टोअरमधून अॅप डाउनलोड करताना, फक्त आवश्यक परवानग्या द्या.
फोन नेहमी अपडेट ठेवा.
फोनमधील थर्ड पार्टी अॅप पडताळून पहा, मगच ते डाउनलोड करा