नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
या ना त्या पदार्थांच्या माध्यमातून आपण आपल्या पोटात अनावश्यक घटकांना सामावून घेत असतो. काहींच्या आरोग्यावर हे अनावश्यक घटक वाईट परिणाम करतात, तर ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. पण सध्या एक घटक असा आहे जे शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा घातक ठरत आहे.
हा धोकादायक घटक आहे प्लास्टिक. प्रदूषणात भर घालणारा एक मोठा घटक म्हणजे प्लास्टिक होय. या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी असंख्य उपाय केले जातात. पण जोपर्यंत प्लास्टिकची निर्मिती होत आहे तोपर्यंत वापर होत राहणार. त्यामुळे प्लास्टिक पूर्णपणे हद्दपार झाल्याशिवाय प्रदूषणातून मुक्तताही शक्य होणार नाही. अशात प्लास्टिकचेच छोटे छोटे कण वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या शरीरात जात आहेत.
आपण नकळतपणे या प्लास्टिकचे सेवन करतोय, त्यामुळे लक्षात येणं शक्य नाही, हेही तेवढच खरं. पाणी मीठ, मासे, बिअर, साखर आणि मध या पदार्थांसोबत प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. ५ मीमी पेक्षा कमी आकाराचे हे प्लास्टिक कण पचन, श्वसन आणि रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतात. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे.
प्रजननाची समस्या
मायक्रोप्लास्टिकमुळे ह्रदयरोगाशी आणि प्रजननाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्याचवेळी मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोग यासारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकतं. आता मायक्रोप्लास्टिकची संख्या आणि त्याचा संभाव्य धोका संशोधकांच्या माध्यमातून कधी निश्चित होतो, याची प्रतिक्षा लागलेली आहे.
पिण्याचे पाणी धोकादायक
पिण्याचे पाणी सुद्धा धोकादायक असल्याचे संशोधन पुढे आले आहे. या माध्यमातूनही पोटात प्लास्टिक जात असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात यामध्ये नारळाचे पाणी आणि पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा समावेश आहे. बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक असते, असे संशोधक म्हणतात.
Alert Microplastic Human Body Consumption Side Effects