माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
श्रीलंकेपासून विदर्भापर्यन्त समुद्रसपाटी पासुन ९०० मीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत दक्षिणोत्तर पसरलेला हवेच्या कमी दाबाचा आस व त्यातुन महाराष्ट्राच्या भूभागावर तयार झालेली ‘वारा खंडितता’ प्रणाली ह्यामुळे आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि.२५ मार्च पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता ही कायम आहे. शक्यता कायम असली तरी तीव्रता मात्र कमी जाणवते, ह्याचीही नोंद मनी असावी. त्यामुळे शेतकऱ्यांनी अति धास्ती मनी बाळगू नये, असे वाटते.
आज मंगळवार दि. २१ मार्चपासुन येत्या ३ दिवसात महाराष्ट्रात दिवसाच्या कमाल तापमानात हळूहळू जवळपास ३ डिग्रीने पुन्हा वाढ होण्याची शक्यता जाणवते, व त्यानंतर हे तापमान स्थिर राहण्याची शक्यता मात्र कायम आहे.
भाकीत केल्याप्रमाणे सोमवार दि.२० मार्च पासुन पावसाळी वातावरण काहीसे निवळळेच. तरी देखील मुंबई शहर व परिसरात तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपात २० ला रात्री तर २१ ला सकाळी पावसाने हजेरी लावली.
मुंबईतील हा पाऊस, नैरूक्त राजस्थान व गुजरात राज्यातील सध्य:स्थित समुद्रसपाटीपासुन दिड किमी पर्यन्तच्या हवेच्या जाडीत वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्याच्या अतिबाहेरील परीघ क्षेत्रातुन तसेच जोडीला दुपारी ४ ते मध्यरात्रीपर्यंत वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्याच्या संयोगातून अरबी समुद्रातुन लोटलेल्या आर्द्रतेच्या उरध्वगामनातून तेथील स्थानीय क्षेत्रावर, मुंबई शहर परिसरात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाने हजेरी लावली.
कोकणात पावसाळी वातावरणाचा जोर ओसरलेला असला तरी कधी कधी अश्या वातावरणीय प्रणालीतून किरकोळ पाऊसही पडून जातो. त्यातलाच हा एक भाग समजावा.
‘वारा खंडितता’ ही संकल्पना हवामान साक्षरतेसाठी नंतर चांगल्या पद्धतीने स्पष्ट केली जाईल. वरील १, व २ मधील वातावरणीय प्रणालीची माहिती ह. साक्षरतेसाठीच स्पष्ट केली, असे समजावे. ही विनंती. सध्याच्या वातावरण निवळणीची शक्यता जाणवल्यास लगेचच लिहिले जाईल.
Alert Maharashtra Rainfall Climate Weather