नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काश्मीर फाइल्स या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण या चित्रपटावर सायबर गुन्हेगारांचीही नजर असल्याचं समोर येतंय. या चित्रपटाच्या नावाखाली ते स्मार्टफोन वापरणाऱ्यांना फसवण्याचे काम करत आहेत. नोएडा येथील पोलिस अधिकारी रणविजय सिंह यांनी स्मार्टफोन वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
काश्मीर फाइल्सबाबत व्हॉट्सअॅपवरुन मोठी फसवणूक सुरू असल्याचं देशातील काही ठिकाणी उघडकीस आले आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस अधिकारी रणविजय म्हणाले, काश्मीर फाइल्सशी संबंधित कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. दिल्लीत काही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत ज्यात काश्मीर फाईलच्या नावाने फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. या चित्रपटाबाबत इंटरनेटवर बरीच चर्चा सुरू आहे. याचाच फायदा घेत सायबर घोटाळेबाजांनी व्हॉट्सअॅपवरून काश्मीर फाइल्स चित्रपट मोफत डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा वापरकर्ते या लिंक्सवर क्लिक करतात, तेव्हा स्कॅमर वापरकर्त्यांच्या फोनवर ऍक्सेस कंट्रोल मिळवतात आणि गोपनीय तपशील, बँक खाती सहजपणे चोरतात. वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर आढळणाऱ्या अशा लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला.
फसवणूक करणारे प्रथम व्हॉट्सअॅपवरून मेसेज करून एक-एक लिंक पाठवतात. मग काश्मीर फाइल विनामूल्य डाउनलोड करण्यास सांगतात. जेव्हा वापरकर्ते या लिंकवर क्लिक करतात, तेव्हा स्कॅमर फोनवर व्हायरस टाकतात. हा व्हायरस वापरकर्त्यांचे बँकिंग आणि इतर तपशील चोरतो. बँकिंग फसवणुकीसाठी कोण जबाबदार आहे.