नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना इशारा जारी केला आहे. त्यात महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे सुनिश्चित करावे, अतिरिक्त सतर्कता बाळगावी तसेच कोरोना नियमांचे कठोरतेने पालन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्य सरकारांना केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी वरील राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पत्रामध्ये ते सांगतात, गेल्या दोन महिन्यांमध्ये देशात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून आली. देशभरात एक हजारांहून कमी रुग्ण आढळले होते. परंतु काही राज्यांमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, हा चिंतेचा विषय आहे. उत्तर प्रदेशमध्ये १२ एप्रिलपर्यंत फक्त २१७ नवे रुग्ण आढळले होते. परंतु १९ एप्रिल येता येता कोरोनाचे ६३७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये १२ एप्रिलपर्यंत कोरोनाचे ९९८ रुग्ण आढळले होते. १९ एप्रिलपर्यंत वाढून २,६७१ रुग्ण आढळले आहेत.
दिल्लीच्या शेजारील राज्य हरियाणामध्ये १२ एप्रिलपर्यंत ५२१ रुग्ण आढळले होते. १९ एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या वाढून १,२९९ झाली आहे. मिझोरममध्ये १२ एप्रिल रोजी ५२१ रुग्ण आढळले होते. आता ते वाढून ५३९ झाले आहेत. संबंधित राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच उपाय योजण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये टेस्ट म्हणजे तपासणी, ट्रॅक म्हणजेच रुग्ण ओळखणे,
ट्रिट म्हणजे उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.