पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर वापरणाऱ्या युजर्ससाठी सरकारने इशारा दिला आहे. आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) नुसार, जे युजर्स डोळेझाकपणे या माध्यमाचा वापर करत आहेत, त्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. अहवालानुसार, गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. ज्यामुळे फसवणूक करणारे सिस्टीममध्ये धोकादायक कोड कार्यान्वित करतात आणि आपल्या कॉम्प्युटरचा रिमोट एक्सेस घेत सुरक्षेत बाधा आणतात.
सरकारची ही चेतावणी विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी आहे जे गुगल क्रोम ब्राउझर 99.0.4844.74 ही किंवा त्यापूर्वीची आवृत्ती वापरत आहेत. सरकारी एजन्सीच्या इशाऱ्यामध्ये असे म्हटले आहे की गुगल क्रोम ब्राउझरमध्ये ब्लिंक लेआउट, एक्सटेंशन, सेफ ब्राउझिंग, स्प्लिटस्क्रीन, अँगल, न्यू टॅब पेज, ब्राउझर UI आणि GPU मध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे युजर्सनी गुगल क्रोमची 99.0.4844.74 ही आवृत्ती लवकरात लवकर अपडेट करावी. गुगल क्रोमप्रमाणे, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरच्या युजर्सलाही त्रुटींबद्दल इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवाय, ऑनलाइन व्यवहार करण्याचे, या माध्यमावर विसंबून राहण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर सिस्टीम अपडेट करुन घेणं महत्त्वाचं आहे.
असे करा क्रोम ब्राउझर अपडेट
डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, सर्व युजर्सनी जुने ब्राउझर अपडेट केले पाहिजे.
ते अपडेट करण्यासाठी, क्रोम ब्राउझर उघडा आणि मेनूवर जा.
त्यानंतर हेल्प ऑप्शनवर क्लिक करा.
येथे तुम्हाला अबाउट गुगल क्रोम नावाचा पर्याय दिसेल.
तुम्ही येथे जाताच तुमचा क्रोम ब्राउझर अपडेट होण्यास सुरुवात होईल.
त्यानंतर तुम्हाला ‘रिलाँच’ वर क्लिक करावे लागेल.