मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेल्या दोन वर्षांत महामारीमुळे आपली सगळी कामे डिजिटलाइज्ड झाली आहेत. परंतु त्यासोबतच सायबर गुन्हेगारीमुळे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोका निर्माण झाला असून, तो आणखी वाढला आहे. सायबर गुन्हेगारी उजेडात आणण्याच्या उद्देशाने नॉर्डव्हीपीएन (NordVPN)ने नुकताच १४० देशांमध्ये ४० लाख पेमेंट्स कार्डबद्दलचा एक अभ्यास जारी केला आहे. एक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड फक्त सहा सेकंदांमध्ये हॅक केले जाऊ शकते, असा खुलासा या अभ्यासाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
ब्रूट फोर्सिंग (brute forcing) हा पेमेंट कार्ड हॅक करण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. याद्वारे अविश्वसनीयरित्या वेगाने काम केले जाते आणि काही सेकंदातच काम अंमलात आणले जाते. नॉर्डव्हीपीएनमध्ये सीटीओ, मारिजस ब्रीडिस सांगतात, डार्क वेबवर इतक्या मोठ्या प्रमाणात पेमेंट कार्ड दिसण्याचा क्रूर बल हा एकमात्र मार्ग असू शकतो. याचा अर्थ असा आहे, की सायबर गुन्हेगार हे कार्डचा क्रमांक आणि सीव्हीसीचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात. आधीचे ६ ते ८ क्रमांकाचे कार्ड जारीकर्त्याचा आयडी क्रमांक आहे. तो हॅकर्सला अंदाज लावण्यासाठी ७ ते ९ क्रमांक देतो कारण १६ वा अंक एक चेकसम आहे आणि त्याचा वापर फक्त क्रमांक नोंदणी करताना कोणती चूक झाली आहे की नाही, हे निर्धारित करण्यासाठी केला जातो. कॉम्प्युटरच्या माध्यमातून असे हल्ले करण्यासाठी फक्त सहा सेकंद लागतात.
या पार्श्वभूमीवर ब्रीडिस सांगतात, की संशयित हालचाली पाहण्यासाठी कार्ड वापरकर्त्यांना आपले महिन्याचे स्टेटमेंट रिव्ह्यू करणे आवश्यक आहे. तुमच्या बँकेच्या प्रत्येक सिक्युरिटी नोटिफिकेशनचे त्वरित उत्तर देणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या कामांसाठी वेगळे बँक खाते ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ज्या खात्याशी तुमचे पेमेंट कार्ड जोडलेले आहे, त्यामध्ये थोडे पैसे ठेवावे. काही बँक तात्पुरते व्हर्च्युअल कार्ड देतात. त्याचा तुम्ही वापर करू शकतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच एका पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. या पुस्तिकेत फसवणूककर्त्यांकडून वापरात येणारे सामान्य प्रकार आणि जनतेने बाळगल्या जाणाऱ्या सावधगिरीच्या सूचना तसेच डिजिटल स्वच्छतेच्या उपायांवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. नागरिकांनी टेलिफोन किंवा ईमेलच्या माध्यमातून देण्यात आलेल्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नये आणि अशा कोणत्याही प्रस्तावावर पेमेंट करू नये किंवा कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.