नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी काम करताना अनेक वेळा बदलीचे प्रसंग येतात. सहाजिकच एका गावाहून दुसऱ्या गावात जाण्याची वेळ येते. त्यामुळे घर संसाराचा सामान ट्रक, टेम्पो किंवा अन्य वाहनांमध्ये टाकून न्यावा लागतो. यासाठी मोठे कष्ट पडतात, सामानाची जमवाजमव, पॅकींग, सामान वाहनांमध्ये चढविणे, उतरविणे, सामान ठेवणे, लावणे यासारखी अनेक कामे असतात. त्यामुळेच अलीकडच्या काळात अनेकजण मूव्हर्स-पॅकर्स या सारख्या उपक्रमाचा किंवा सेवेचा लाभ घेतात त्यामध्ये धोका देखील आहे, असे दिसून येते.
घर आणि कार्यालयातील सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम करणाऱ्या पॅकर्स-मूव्ह उद्योगातील बनावट कंपन्या ग्राहकांना स्वस्तात आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत आहेत. पॅकर्स आणि मूव्हर्स कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या मुव्हर्स फेडरेशन ऑफ इंडियाने (MFI) ग्राहकांना इशारा दिला आहे की, डिजिटल वापरानंतर फसवणुकीत वाढ झाली आहे आणि कंपन्यांवर विश्वास न ठेवता त्यांची तपासणी करणे अडचणीचे ठरू शकते.
या संघटनेचे म्हणणे आहे की, दररोज दोन ते तीन अशी प्रकरणे समोर येत आहेत यात बनावट कंपन्या माल घेऊन गायब होत आहेत. एमएफआयचे प्रवक्ते आणि सचिव अनूप मिश्रा म्हणाले की, या पाच अब्ज डॉलर्सच्या उद्योगात सुमारे 45 लाख कामगारांना थेट रोजगार आहे. तर अप्रत्यक्ष स्वरूपाची ही संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. या उद्योगासाठी कोणतेही परवाना धोरण नसून बनावट कंपन्या केवळ मोबाईल सिम घेऊन व्यवसाय सुरू करतात, असे त्यांनी सांगितले.
बनावट कंपन्या भाड्याने घेतलेल्या मजुरांद्वारे आणि भाड्याने घेतलेल्या वाहनांद्वारे ग्राहकांच्या घरगुती वस्तू पॅक करतात आणि त्या निर्धारित ठिकाणी पोहोचवण्याऐवजी ते रस्त्याच्या मध्यभागी कुठेतरी विकतात. अशा कंपन्यांकडे कोणतेही रेकॉर्ड नसल्यामुळे तक्रारींनंतर त्यांचा शोध घेणे अवघड आहे. तसेच एमएफआयच्या म्हणण्यानुसार, नामांकित कंपन्यांसारखीच नावे असलेल्या कंपन्यांकडूनही ग्राहकांची दिशाभूल केली जाते.
एमएफआयचे म्हणणे आहे की अशा प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर कंपन्यांची यादी तयार केली आहे, त्याद्वारे ग्राहक सेवा घेऊ शकतात. या यादीमध्ये, कंपन्यांना छाननीच्या अनेक टप्प्यांसाठी स्थान मिळते व त्यांच्याकडून कोणतीही चूक झाल्यास संस्था कठोर कारवाई करते.