मुंबई (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – व्हॉट्सअॅपचा नवा घोटाळा समोर आला आहे. त्याचे नाव आहे Rediroff.com हा घोटाळा गेल्या काही दिवसांपासून या प्रसिद्ध इन्स्टेंट मेसेजिंग अॅपवर फिरत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या घोटाळ्याच्या माध्यमातून युजर्सच्या बँक आणि कार्ड डिटेल्ससारखी वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्याचे काम भामटे करत आहे. ते तुमच्या अँड्रॉइडच नव्हे, तर आयओएस स्मार्टफोन संक्रमित करू शकतात, शिवाय पीसीमध्येसुद्धा घुसखोरी करू शकतात.
व्हॉट्सअॅप घोटाळा काय आहे
या घोटाळ्याची सुरुवात कशी झाली हे सांगणे कठिण असले तरी सीएनबीसीच्या वृत्तानुसार, या घोटाळ्याने व्हॉट्सअॅप युजर्स प्रभावित झाले आहेत. या घोटाळ्यात युजर्सना महागड्या भेटवस्तूंचा लोभ दाखवून जाळ्यात अडकवले जाते. लिंकवर क्लिक केल्यानंतर एक संकेतस्थळ उघडते. सर्वेक्षण भरल्यानंतर तुम्हाला एक भेटवस्तू मिळेल असे त्यावर लिहिलेले असते.
युजर्सनी प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्यांना एका संकेतस्थळावर पाठविले जाते. तिथे त्यांना नाव, वय, पत्ता, बँक अकाउंट आणि वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते. एकदा संपूर्ण माहिती भरल्यानंतर हा डेटा भामट्यांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही. घोटाळेबाज या डेटाचा वापर पैशांची देवाणघेवाण किंवा अनधिकृत कृत्य करण्यासाठी करतात. युजर्सच्या डिव्हाइसमध्ये अनावश्यक अॅप्लिकेशनसुद्धा इन्स्टॉल करू शकतात.
ही गोष्ट अवश्य करा
जर तुम्हाला Rediroff.ru शी संबंधित कोणतीही लिंक व्हॉट्सअॅपवर आली तर ती त्वरित तिला स्पॅम म्हणून रिपोर्ट करायला हवे. ती लिंक त्वरित डिलिटही करायला हवी. जर चुकून तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले तर तुमच्या डिव्हाइसला कोणत्याही मालवेअर किंवा व्हायरसपासून वाचविण्यासाठी स्कॅन करणे आवश्यक आहे.